मुंबई : विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन संपल्यावर राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली असतानाच हा विस्तार आता ३० डिसेंबर रोजी होईल, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी सोमवारी दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात सोमवारी झालेल्या बैठकीत मंत्रिमंडळ विस्तारावर शिक्कामोर्तब झाल्याचे सांगण्यात आले. नव्या मंत्र्यांचा शपथविधी त्याच दिवशी दुपारी एकच्या सुमारास होईल, असेही सूत्रांचे म्हणणे आहे.
शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांच्या याद्या तयार झाल्या असताना काँग्रेसच्या मंत्र्यांची यादी अंतिम न झाल्यामुळे हा विस्तार काही दिवस लांबणीवर पडला आहे. महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार आज, मंगळवारी करण्यासाठी लगबग सुरू होती. परंतु, काँग्रेसच्या मंत्र्याच्या यादीचा घोळ चालूच आहे. अशोक चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाण या दोन माजी मुख्यमंत्र्यांना मंत्रिमंडळात येण्याची इच्छा आहे. परंतु, केवळ अशोक चव्हाण यांचाच मंत्रिमंडळात समावेश होणार असून, पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर पक्षाची जबाबदारी सोपविण्यात येणार असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळेच विस्ताराचा मंगळवारचा (२४ डिसेंबर) मुहूर्त ३० डिसेंबरवर गेला असल्याचे कळते. विस्तारासाठीच्या तांत्रिक बाबींपैकी काहींची पूर्तताही झाली आहे.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.