अखेर १९७०च्या दशकातील सर्वात मोठा कोला ब्रँड कॅम्पा कोलाचे भारतीय बाजारपेठेत पुनरागमन झाले आहे. या देशी बँडची मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखालील रिलायन्स ग्रुपने खरेदी करून तीन फ्लेवरमध्ये त्याचे लाँचिंग केले आहे. त्यामुळे या सेक्टरमध्ये बाजारात आपले अस्तित्व निर्माण केलेल्या पेप्सी, कोका कोला आणि स्प्राइटसह इतर सॉफ्ट ड्रिंकला कॅम्पा कोलाकडून मोठी टक्कर मिळू शकते. रिलायन्सच्या हातात सुत्रे आल्यानंतर कॅम्पा कोला पुन्हा एकदा मार्केटमध्ये आपला दबदबा कायम ठेवण्यासाठी सरसावला आहे. गेल्या वर्षी ऑगस्ट २०२२ मध्ये रिलायन्सकडून कॅम्पा कोलाच्या अधिग्रहणाची घोषणा झाली होती. आता टेकओव्हर पूर्ण झाल्यानंतर हा ब्रँड बाजारात आला आहे. रिलायन्सने दिल्लीस्थीत प्युअर ड्रिंक ग्रुपकडून हा ब्रँड घेतला आहे.
आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, आपल्या रिटेल व्यवसायाचा विस्तार करताना रिलायन्सचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी एकापाठोपाठ एक नव्या क्षेत्रात झेप घेतली आहे. याच श्रृंखलेत त्यांनी कोला बाजारात पाऊल ठेवले आहे. त्यांनी ७० च्या दशकातील कॅम्पा कोला ब्रँड निवडला आहे आणि प्युअर ड्रिंक ग्रुपसोबत २२ कोटी रुपयांची ही डिल केली आहे. कॅम्पा कोला स्पार्कलिंग बेव्हरेज कॅटेगरीत भारतातील आपला ब्रँड आहे. प्युअर ड्रिंक्स ग्रुप १९४९ ते १९७० च्या दशकापर्यंत भारतात कोका-कोलाचा एकमेव डिस्ट्रिब्युटर होता. प्युअर ड्रिंक्सने स्वतःचा ब्रँड तयार केला. कोका-कोला आणि पेप्सी देशाबाहेर गेल्यानंतर लवकरच हा या सेक्टरमधील टॉप ब्रँड बनला होता. कंपनीने आपल्या व्यवसायाचा विस्तार करताना कॅम्पा ऑरेंज लाँच केला होता. ‘द ग्रेट इंडियन टेस्ट’ हे त्याचे स्लोगन खूप चर्चेत होते.