नवी दिल्ली : G-20 अंतर्गत दोन दिवसीय संसदीय स्पीकर्स समिट शुक्रवारपासून सुरू होत आहे. मात्र भारत आणि कॅनडामधील राजनैतिक संबंध तणावपूर्ण बनल्याने कॅनडाचे सिनेट अध्यक्ष रेमंड गग्ने हे भारताने आयोजित केलेल्या संसदीय स्पीकर्स समिट कार्यक्रमाला उपस्थित राहणार नाहीत, अशी माहिती रेमंड गग्ने यांच्या कार्यालय प्रवक्त्याने बुधवारी दिली.
दोन भारतीय अधिकार्यांनीही रेमंड गग्ने या शिखर परिषदेला येणार नसल्याचे पुष्टी दिली. त्यांनी सांगितले की, त्यांनी गैरहजेरीचे कोणतेही कारण दिलेले नाही. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी गेल्या आठवड्यात मीडियाला रेमंड गग्ने उपस्थित राहणार असल्याचे सांगितले होते. या बैठकीत कॅनडाचे प्रतिनिधी उपस्थित राहणार की नाही, हे स्पष्ट नाही. ब्लूमबर्ग न्यूजने संपर्क साधला असता स्पीकर कार्यालयाच्या प्रवक्त्याने टिप्पणी करण्यास नकार दिला.
पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी कॅनडातील शीख अतिरेक्याच्या हत्येमध्ये भारत सरकारची सक्रिय भूमिका असल्याचा जाहीर आरोप केल्यापासून दोन्ही देशांमधील संबंध कमालीचे बिघडले आहेत. भारताने ट्रूडो यांचे सर्व आरोप निराधार असल्याचे म्हटले आहे. जेव्हा काही चर्चा वैयक्तिक केल्या जातात, तेव्हा मुत्सद्देगिरी कामाला येते. जेव्हा भारताचा प्रश्न येतो, तेव्हा मी तोच दृष्टीकोन अवलंबेन, असे कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री मेलानी जोली यांनी बुधवारी पत्रकारांना सांगितले.