सांगली : सांगली जिल्ह्यातील ऊस दराचा तिढा सुटत नसल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. कार्यकर्त्यांनी वसंतदादा साखर कारखान्यासमोर आंदोलन करीत कारखान्यात घुसण्याचा प्रयत्न केला. कार्यकर्त्यांनी पोलिसांना झुगारून कारखान्याच्या गेटवर चढून आंदोलन केले आणि आत शिरण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, कोल्हापूरप्रमाणे सांगलीतील कारखानदारांनी दर द्यावा अशी मागणी शेतकरी नेते व स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टी यांनी केली.
एबीपी लाईव्हमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, सांगली जिल्ह्यातील ११ कारखाने आमदार जयंत पाटील आणि विश्वजीत कदम यांच्या नियंत्रणात आहेत. या आमदारांमुळे ऊस दराचा तिढा सुटत नाही अशी टीका शेट्टी यांनी केली. राज्यात ज्या पद्धतीने उसाला रिकव्हरी आहे, त्या पद्धतीने साखर उद्योगाचे झोन करण्यात आले आहेत. त्यामुळे कोल्हापूर विभागात रिकव्हरी जादा आहे. एफआरपी जादा आहे. कारखान्यांनी त्याच पद्धतीने दर द्यावा अशी आमची मागणी आहे, असे शेट्टी यांनी सांगितले. रिकव्हरी कमी आहे असा जावईशोध सांगलीच्या कारखानदारांनी लावला आहे. सात ते आठ कारखाने जादा रिकव्हरीचे आहेत. अकरा कारखाने जयंत पाटील आणि विश्वजित कदम यांच्या नियंत्रणात आहेत. त्यांच्यामुळे ऊस दराचा तिढा सुटत नाही असा आरोप शेट्टी यांनी यावेळी केला.