सांगली : तोडणी मजुरांना द्यावा लागणारा डव्हान्स, डिझेल, वाहनांच्या सुट्या भागाच्या वाढलेल्या किंमती, वाहन चालकांचा वाढलेला पगार या सर्व गोष्टींचा विचार करता ऊस वाहतूक दरवाढीचा विचार होणे गरजेचे आहे. मात्र त्याबाबतीत कुठेही वाच्यता होताना दिसत नाही. हा ऊस वाहतूकदारांवर अन्याय आहे. ऊस वाहतुकीचे दर वाढवून घेण्यासाठी लढा उभारण्याचा निर्णय स्वाभिमानी ऊस वाहतूक संघटनेच्या बैठकीत घेण्यात आला, अशी माहिती स्वाभिमानी ऊस वाहतूक संघटनेचे नेते पृथ्वीराज पवार, संदीप राजोबा यांनी दिला.
ऊस वाहतूक दरवाढीसंदर्भात शासन व साखर संघाने तत्काळ दखल घ्यावी. वाहतूक दरवाढीचा निर्णय करावा, अन्यथा ऊस वाहतूकदारांचे आंदोलन सुरु करू, असा इशाराही या बैठकीत देण्यात आला. बैठकीला संदीप मगदूम, श्रीकृष्ण पाटील, रवींद्र माने, विठ्ठल पाटील, धन्यकुमार पाटील तसेच ऊस वाहतूकदार, शेतकरी उपस्थित होते.