बेंगळुरू : कावेरी पाणी प्रश्नावरून कर्नाटकात विविध पक्ष, संघटना रस्त्यावर उतरल्या आहेत. त्यांनी तामिळनाडूला पाणी देण्यास तीव्र विरोध केला आहे. या प्रश्नी शुक्रवारी कर्नाटक बंदची हाक देण्यात आली होती. या बंदमुळे जनजीवन विस्कळीत झाले होते.
कर्नाटक बंदमुळे बेंगळुरू विमानतळ, बसस्थानक आणि रेल्वे स्थानक ठप्प झाली होती. आतापर्यंत ४४ विमान उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. राज्य मार्ग परिवहन महामंडळानेही बससेवा बंद केल्याने प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. कावेरी पाणी वाटप वादावर शेतकरी आणि कन्नड समर्थक संघटनानी विमानतळाबाहेर निदर्शने केली. पोलिसांनी 12 जणांना खबरदारी म्हणून ताब्यात घेतले आहे. बसस्थानकावरही आंदोलकांनी हातात पोस्टर घेऊन घोषणाबाजी केली.
कर्नाटक सरकारने कावेरी नदीचे पाणी तामिळनाडूला सोडल्याच्या निषेधार्थ राज्यात राज्यव्यापी बंद पुकारण्यात आला होता. ‘कन्नड ओक्कुटा’ ने सकाळी 6 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत बंद पुकारला आहे. या पार्श्वभूमीवर बेंगळुरू शहर कलम 144 लागू केले आहे. शुक्रवारी पहाटे बेंगळुरूमधील केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण आणि लँडिंग रद्द करण्यात आले आहे. त्यापैकी 22 इनकमिंग आणि 22 आउटगोइंग होते.