पूर्णा सहकारी साखर कारखान्याच्या वार्षिक सभेत ‘सीबीजी’ वरून गदारोळ

वसमत : येथील पूर्णा सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवारी (ता. १४) आयोजित करण्यात आली होती. वार्षिक सर्वसाधारण सभेत सीबीजी (कॉम्प्रेस्ड बायो गॅस) प्रकल्पाला सभासदांनी हात उंचावून मंजुरी दिली. तर आमदार राजू नवघरे समर्थक सभासदांनी या विषयावर मतदानाची मागणी करत ठराव मंजूर नसल्याचे सांगितले. आमदार नवघरे हे व्यासपीठावर बोलण्याचा प्रयत्न करीत असताना त्याला माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांनी मनाई करून सभा विसर्जित केली. यानंतर सभासदांच्या दोन गटात प्रचंड घोषणाबाजी झाली.

या प्रकारानंतर कारखान्याचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर, उपाध्यक्ष डॉ. सुनील कदम, संचालक आमदार राजू नवघरे यांच्यासह संचालकांच्या उपस्थितीत नऊ विषयांवर चर्चा झाली. आठ विषयांना मंजुरीनंतर महत्वाकांक्षी सीबीजी (कॉम्प्रेस्ड बायोगॅस) प्रकल्पाच्या उभारणीबाबत सभासदांना बोलण्यास सांगितले. काही सभासदांनी यापूर्वीच्या उपपदार्थांच्या प्रकल्पातून काहीच फायदा झाला नसल्याने तो रद्द करा, अशी मागणी केली. तर काही सभासदांनी प्रकल्प व्हावा, असे सांगितले. सभासदांनी हात उंचावून प्रकल्प उभारण्यास मंजुरी दिली. यावर आमदार राजू नवघरे यांनी आक्षेप घेत मतदानाची मागणी केली. मात्र सभा विसर्जित करत माजी मंत्री दांडेगावकर निघून गेले. याबाबत अध्यक्ष मनमानी कारभार असल्याचा आरोप करीत आमदार नवघरे यांनी मी आणि इतर चार असे पाच जण संचालकपदाचा राजीनामा देणार असल्याचे सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here