नवी दिल्ली: केंद्र सरकारच्या खाद्य मंत्रालयाने मार्च महिन्यासाठी साखरेचा कोटा २६ फेब्रुवारी रोजी जाहीर केला आहे. देशातील ५५२ कारखान्यांना साखर विक्रीसाठी २१ लाख टन कोटा जाहीर केला आहे.
दरम्यान, या महिन्यात गेल्या महिन्याच्या तुलनेत जादा साखरेचा कोटा मंजूर करण्यात आला आहे. यापूर्वी मंत्रालयाने फेब्रुवारी २०२१ साठी १७ लाख टन साखरेचा कोटा मंजूर केला होता. तर दुसरीकडे मार्च २०२० मध्ये या महिन्याच्या तुलनेत समान साखर विक्रीस मंजूरी दिली गेली आहे. सरकारने मार्च २०२०मध्येही २१ लाख टन साखर विक्रीला मंजूरी दिली होती.
बाजारातील तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, हिंदू संस्कृतीतील प्रमुख होळीचा सण आणि त्यापाठोपाठ उन्हाळ्याची चाहूल लागत असल्याने बाजारात मागणी सकारात्मक राहील अशी शक्यता आहे. तर काही तज्ज्ञांच्या मते आतापर्यंत साखरेच्या किमतीबाबत शंका उपस्थित करण्यात आली होती. कारण, सणासुदीचीच्या मागणीत बदल होऊ शकतो.
केंद्र सरकारने साखरेची विक्री नियंत्रित करण्यासाठी आणि दरात स्थिरता आणण्यासाठी दरमहा साखर विक्रीचा कोटा जाहीर करण्याचे धोरण स्वीकारले आहे.