नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या अन्न मंत्रालयाने ३० डिसेंबर २०२१ रोजी जारी केलेल्या अधिसुचनेनुसार जानेवारी २०२२ साठी देशातील ५५८ कारखान्यांना साखर विक्रीसाठी २१.५० लाख टनाचा कोटा मंजूर केला आहे. याशिवाय डिसेंबर २०२१च्या विक्री न झालेल्या साखरेसाठीही ३० दिवसांची मुदतवाढ देण्याची घोषणा करण्यात आली आहे.
यावेळी गेल्या महिन्याच्या तुलनेत समान साखर कोटा मंजूर करण्यात आला आहे. अन्न मंत्रालयाने डिसेंबर २०२१ साठी २१.५० लाख टन साखर विक्री कोटा मंजूर केला होता. दुसरीकडे जानेवारी २०२१च्या तुलनेत या वेळी कमी कोटा मंजूर करण्यात आला आहे. सरकारने जानेवारी २०२१साठी २० लाख टन साखर कोटा मंजूर केला होता.
काही कारखाने, व्यापाऱ्यांना डिसेंबर २०२१साठी मंजूर झालेला कोटा उचलण्यासाठी लॉजिस्टिकच्या अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे डिसेंबर महिन्यातील कोटा विस्तार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
बाजारातील तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, यावेळी गेल्या वर्षीच्या तुलनेत कोटा अधिक मंजूर करण्यात आला आहे. मकर संक्रांतीच्या सणामुळे बाजाराला चांगले दिवस येऊ शकतात. गेल्या महिन्यातील शिल्लक कोटाही फारसा नाही. त्यामुळे चांगली स्थिती शक्य आहे. केंद्र सरकारने साखरेचा पुरवठा नियंत्रण आणि दर मर्यादीत तसेच स्थिर ठेवण्यासाठी मासिक कोटा मंजूरीची पद्धती लागू केली आहे.