नवी दिल्ली : भारताने सरकार ते सरकार (जी२जी) स्तरावरील चर्चेनंतर दहा लाख टन साखर पाठविण्यास नकार दिल्यानंतर बांगलादेशात साखरेची तस्करी वाढली आहे. यासोबतच भारताकडून देशांतर्गत बाजारपेठेत पुरवठा वाढवणे आणि किमती नियंत्रणात राखण्यासाठी गेल्या सप्टेंबरपासून निर्यातीवर निर्बंध लागू केल्यानंतर शेजारील देशांमध्ये तुकडा तांदळाची तस्करीही वाढली आहे. अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागा (डीएफपीडी) ने गेल्यावर्षी ऑक्टोबर महिन्यात साखर निर्यात मुक्त श्रेणीतून प्रतिबंधीत श्रेणीमध्ये आणली आहे. देशांतर्गत पुरवठा सुरळीत राखण्यासाठी हे निर्बंध ३० ऑक्टोबरपर्यंत लागू राहतील.
याबाबत लाईव्ह मिंट मध्ये प्रकाशित वृत्तानुसार, केंद्र सरकारला तस्करीमुळे साखर साठ्यावर परिणाम होऊ शकतो, अशी भीती वाटत आहे. या दोन वस्तूंच्या तस्करीमुळे अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाने बांगलादेशच्या ४,०९६ किलोमीटर लांब आंतरराष्ट्रीय सीमेची सुरक्षा करणाऱ्या सीमा सुरक्षा दलासोबत (Border Security Force- BSF), सुरक्षा एजन्सीज, कस्टम अधिकाऱ्यांशी चर्चा सुरू केली आहे. या अवैध निर्यातीला आळा घालण्यासाठी उपाय योजना करणे आणि त्यासाठी धोरण आखणे हे अधिकाऱ्यांचे ध्येय आहे.