पुणे : केंद्र सरकारने देशभरातील साखर कारखान्यांना बी हेवी मोलॅसिसपासून इथेनॉल बनविण्यास बंदी घातली. मात्र या बंदीपूर्वी सुमारे साडेपाच लाख टन बी हेवी मोलॅसिस साठा कारखान्यांकडे शिल्लक आहे. साखर कारखान्यांनी तो साठवून ठेवला होता. तसेच त्याचे काहीच करता येत नसल्याने हजारे कोटी रुपयांचे नुकसान होणार होते. आता केंद्र सरकारकडून बी हेवी मोलॅसिसचे इथेनॉलमध्ये रुपांतर करण्यास लवकरच परवानगी मिळण्याची शक्यता आहे, अशी माहिती राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, माजी मंत्री, भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी दिली.
अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले की, केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे सुमारे ४७ कोटी लिटर इथेनॉलची निर्मिती होऊन साखर कारखान्यांना २८५० कोटी रुपये मिळतील, त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा मोठा फायदा होईल तसेच बी हेवी मोलॅसिस हा धोकादायक पदार्थ साठवून ठेवण्याची जोखीमही राहणार नाही. तसा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन आहे. यासंदर्भात लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे. या निर्णयाला आचारसंहितेचा अडथळा येणार नाही असे मत हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केले.