मुंबई: केंद्र सरकारने महाराष्ट्राला कर्नाटकमधून मेडिकल ऑक्सीजनच्या पुरवठ्यात ५० मेट्रिक टनाची कपात केली आहे. त्यामुळे कोविड १९च्या रुग्णांवर उपचारात गंभीर प्रभाव पडू शकेल असे महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. महाराष्ट्राने मेडिकल ऑक्सीजनच्या पुरवठ्यातील कमतरतेचा मुद्दा केंद्रीय आरोग्य मंत्रालयासमोर उचलण्याची गरज आहे. देशात सद्यस्थितीत कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहेत असे मंत्री टोपे यांनी सांगितले.
पत्रकारांशी बोलताना टोपे म्हणाले, केंद्र सरकारने कर्नाटकमधून महाराष्ट्राला मेडिकल ऑक्सीजनच्या पुरवठ्यात ५० टनाची कपात केली आहे. सद्यस्थितीत १७५० टन ऑक्सीजनचा वापर केला जात आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या सोबत हा मुद्दा उपस्थित करण्याची गरज आहे.
ते म्हणाले, राज्य सरकार कोरोना विषाणूच्या गंभीर रुग्णांवर उपचार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ऑक्सीजनचे उत्पादन वाढविण्यासाठी प्रेशर स्विंग एड्सॉर्पशन (पीएसए) मेडिकल ऑक्सीजन प्लांट स्थापन करीत आहे. सद्यस्थितीत महाराष्ट्रात १७५० टन ऑक्सीजन वापरले जात आहे. राज्यात २८ पीएसए प्लांटची स्थापना करण्यात येत असल्याची बाब सुखद आहे. राज्याने १५० पीएसए यंत्रांची ऑर्डर दिली आहे. ती लवकरच दाखल होतील.
ऑक्सीजन पुरवठा न झाल्यास स्थिती गंभीर
मंत्री टोपे म्हणाले, जर ऑक्सीजनचा पुरवठा पूर्ववत केला नाही तर आम्हाला गंभीर स्थितीचा सामना करावा लागेल. आम्ही जोपर्यंत पीएसए प्लांटची स्थापना करत नाही, तोपर्यंत राज्याला ऑक्सीजनची गरज आहे.