देशात बहुतांश भागात तीव्र उन्हाळा जाणवत असल्यामुळे अशा उष्णतेचृया लाटेपासून श्रमजीवी वर्गाचा बचाव करण्यासाठी श्रम आणि रोजगार मंत्रालयाने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना एक पत्र लिहिले आहे. विविध क्षेत्रात काम करणार्या कामगार आणि मजुरांवर येणार्या उष्णतेच्या लाटेला तोंड देण्यासाठी प्रभावी व्यवस्थापन सुनिश्चित करण्यास सांगितले आहे. सर्व राज्ये/केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांना/प्रशासकांना उद्देशून लिहिलेल्या पत्रात केंद्रीय कामगार सचिव, आरती आहुजा यांनी व्यापाऱ्यांना/नियोक्ते/बांधकाम कंपन्या/उद्योगांना वाढत्या उष्म्याचे होणारे अत्यंत प्रतिकूल परिणाम कमी करण्यासाठी आवश्यक पावले उचलण्यासाठी निर्देश जारी करण्याच्या गरजेवर भर दिला.
यावर्षी उन्हाळी हंगामासाठी भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) ने जारी केलेल्या अंदाजाचा संदर्भ देवून, या पत्रात म्हटले आहे की, देशात ईशान्य भारत, पूर्व आणि मध्य भारत आणि वायव्य भारताच्या काही भागांमध्ये सामान्यपणे कमाल तापमान दर्शविण्यात आले आहे. अशावेळी कामाच्या ठिकाणी योग्य त्या सुविधा पुरविण्यासाठी धोरणात्मक पावले उचलणे आवश्यक आहे. यामध्ये कर्मचारी/कामगारांच्या कामाच्या तासांचे पुनर्नियोजन करणे, कामाच्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची पुरेशी सोय सुनिश्चित करणे, बांधकाम कामगारांना आपत्कालीन बर्फ पॅक आणि उष्णताजन्य आजार प्रतिबंधक साहित्याची तरतूद करणे, नियमितपणे आरोग्य विभागाशी समन्वय साधणे यांचा समावेश आहे. कामगारांची आरोग्य तपासणी, नियोक्ता आणि कामगारांसाठी आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाद्वारे जारी केलेल्या आरोग्य सल्ल्याचे पालन करण्यात यावे, असे स्पष्ट केले आहे.
कामाच्या ठिकाणाजवळ विश्रांतीसाठी योग्य जागेची सोय, पुरेशा प्रमाणात थंड पाणी आणि आरोग्यपुरक इलेक्ट्रोलाइटची तरतूद करण्यासाठी तात्काळ पावले उचलण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच या संदर्भात खाण व्यवस्थापनाने सूचना जारी करण्याची गरज असल्याचे, या पत्रात म्हटले आहे. कामगाराला अस्वस्थ वाटत असल्यास संथ काम करण्यास अनुमती देणे, विश्रांतीच्या वेळा आणि लवचिक वेळापत्रक निश्चित करणे. कामगारांना दिवसा ज्यावेळी सर्वात कमी तापमान असते, त्यावेळी अवघड, कष्टदायक काम करण्याची परवानगी दिली जावी. अत्यंत उष्ण तापमान असेल त्यावेळी काम करण्यासाठी दोन व्यक्तींच्या नियुक्ती करणे. भूमिगत खाणींमध्ये वायुविजन आणि कामगारांना अति उष्णता आणि आर्द्रतेपासून होणाऱ्या धोक्यांची जाणीव करून देणे आणि त्यावर उपाय सुचविण्यात आले असून त्याप्रमाणे उपाय योजना करण्याचे पत्रात नमूद केले आहे.
कारखाने आणि खाणींव्यतिरिक्त, कामगार सचिवांनी बांधकाम कामगार, आणि वीटभट्टी कामगारांवर विशेष लक्ष देण्याची आणि ‘कामगार चौकां’मध्ये पुरेशी माहिती प्रसारित करण्याची गरज असल्याचे पत्रात म्हटले आहे.