राज्यांना ओएमएसएस अंतर्गत तांदूळ, गव्हाची विक्री बंद करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय

नवी दिल्ली : केंद्र सरकारने महागाई रोखण्यासाठी राज्य सरकारांना ओएमएसएस (ओपन मार्केट सेल स्कीम) अंतर्गत तांदूळ आणि गव्हाची विक्री बंद केली आहे. हा निर्णय कर्नाटक सरकारला आधीच कळविण्यात आला आहे. त्यांनी जुलै महिन्यासाठी ई लिलावशिवाय ओएमएसएसअंतर्गत आपल्या योजनेसाठी ३४०० रुपये प्रती क्विंटल दराने १३,८१९ टन तांदळाची मागणी केली होती. भारतीय अन्न महामंडळाकडून (एफसीआय) जारी करण्यात आलेल्या एका आदेशानुसार, राज्य सरकारांना ओएमएसएस अंतर्गत गहू आणि तांदूळ विक्री बंद करण्यात आली आहे.

अमर उजालामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, ओएमएसएसअंतर्गत तांदळाची विक्री पूर्वोत्तर राज्ये, डोंगराळ राज्ये आणि कायदा व सुव्यवस्थेची स्थिती तसेच नैसर्गिक आपत्तीचा सामना करणाऱ्या राज्यांसाठी ३४०० रुपये प्रती क्विंटलच्या सध्याच्या दराने सुरू राहील. एफसीआय बाजार मूल्य कमी करण्यासाठी गरजेनुसार केंद्रीय साठ्यातून खासगी घटकांना ओएमएसएस अंतर्गत तांदूळ विक्री करू शकतो. १२ जून रोजी केंद्र सरकारने खुल्या बाजारातील किमती कमी करणे आणि साठेबाजीला आळा घालण्यासाठी ३१ मार्च २०२४ पर्यंत गव्हाच्या साठवणुकीवर निर्बंध लागू करत ओएमएसएस अंतर्गत तांदूळ, गव्हाच्या ऑफ लोडिंगची घोषणा केली होती. सरकारने १५ लाख टन गहू ई लिलावाच्या माध्यमातून आटा कारखाने, खासगी व्यापारी, गहू उत्पादनांच्या निर्मात्यांना देण्याची घोषणा केली होती. मात्र, यात तांदळाचे प्रमाण समाविष्ट करण्यात आले नव्हते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here