सांगली : साखरेचा उत्पादन खर्च व ऊसदर यामध्ये तफावत असते, तरीही कारखाना सर्वच खर्चात काटकसर करून सभासदांना जास्तीत जास्त दर देण्याचा प्रयत्न करत आहे. मागील वर्षी कारखान्याने एफआरपीपेक्षा २०९ रुपये जादा दर दिल्याची माहिती क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड सह. साखर कारखान्याचे अध्यक्ष शरद लाड यांनी सांगितले. कारखान्याच्या २८ व्या वार्षिक सभेत ते बोलत होते. सभेच्या अध्यक्षस्थानी क्रांती उद्योग समूहाचे मार्गदर्शक आमदार अरुण लाड होते. साखरेचे दर ठरवणे हे कारखान्यांच्या नव्हे तर केंद्र सरकारच्या हातात आहे. ऊस दर आणि साखरेचा विक्री दर याचा ताळमेळ पाहता शासनाने एफआरपी बरोबरच एमएसपीमध्येही वाढ करणे गरजेचे आहे, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
शरद लाड म्हणाले, गेल्या गळीत हंगामामध्ये १४५ दिवसांत सुमारे १० लाख ९२ हजार लाख टन उसाचे गाळप झाले. सरासरी १२.२४ टक्के साखर उतारा मिळाला. सुमारे ११ लाख ८७ हजार क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. कारखान्याने जिल्ह्यात उच्चांकी उसाचे गाळप केले आहे. येत्या हंगामामध्ये १४ लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे. दिगंबर पाटील यांनी स्वागत केले. आप्पासाहेब कोरे, परबतराव यादव, वीरेंद्र देशमुख आदींनी विषयवाचन केले. शेती अधिकारी दिलीप पार्लेकर, पवन चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले. उपाध्यक्ष दिगंबर पाटील, क्रांती दूध संघाचे अध्यक्ष किरण लाड, उद्योजक दिलीप लाड, राजेंद्र लाड, रणजित लाड, विक्रांत लाड, संचालक पोपट संकपाळ, अश्विनी पाटील, वैभव पवार, स्वातंत्र्यसैनिक विरुपाक्ष लुपणे, सर्जेराव पवार, कुंडलिक एडके, व्ही. वाय. पाटील, अनिल लाड आदी उपस्थित होते.