पुणे : इथेनॉल निर्मितीच्या आधीच्या नियमावलीत केंद्राने बदल केले आहेत. इथेनॉल निर्मितीच्या अनुषंगाने बदललेल्या नियमानुसार, उसाचा रस व मळीच्या वापराबाबत जारी केलेल्या नव्या नियमावलीचा भंग झाल्यास संबंधित साखर कारखाना, आसवनीच्या विरोधात तत्काळ कारवाई करा, असा आदेश केंद्र सरकारने दिला आहे. याबाबत केंद्रीय अन्न मंत्रालयाच्या साखर व खाद्यतेल संचालनालयाचे साखर संचालक संगीत यांनी १५ डिसेंबर २०२३ ला राज्यातील साखर कारखान्यांना एक पत्र पाठवले होते.
साखर व खाद्यतेल संचालनालयाचे अवर सचिव अनिल कुमार स्वारनकर यांनी आता थेट राज्याच्या उत्पादन शुल्क आयुक्तांकडे पत्रव्यवहार केला आहे. या पत्रात म्हटले आहे की, केंद्र सरकारने यापूर्वीच आरएस व इएनएबाबत आदेश दिले आहेत. आदेशांची काटेकोर अंमलबजावणी होईल, यासाठी दक्षता घ्यावी. आदेशाचा भंग झाल्यास राज्य उत्पादन शुल्क विषयक कायद्यानुसार तत्काळ कारवाई करा. कोणत्याही साखर कारखान्याने किंवा आसवनीने रेक्टिफाइड स्पिरिट व एक्स्ट्रा न्युट्रल अल्कोहोल तयार करण्यासाठी उसाचा रस किंवा बी हेव्ही मळी वापरता कामा नये. या पत्रानंतर राज्यातील सर्व प्रकल्पांनी आपल्या नियोजनात बदल केलेले आहेत. दरम्यान, फेरकरारांबाबत केंद्रीय अन्न मंत्रालयाला कळवावे असे निर्देशही देण्यात आले आहेत.