कोल्हापूर : देशाच्या साखर उत्पादनामध्ये उत्तर प्रदेश, महाराष्ट्र व कर्नाटक यांचा वाटा मोठा आहे. मात्र, सद्यस्थितीत महाराष्ट्र व कर्नाटकात ऊस आणि साखर उत्पादन घटण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. याची धास्ती केंद्र सरकार ने घेतली आहे. महाराष्ट्र व कर्नाटकातील साखर उत्पादन कमी झाल्यानेच केंद्र सरकार साखर व इथेनॉलबाबतचे उलटसुलट निर्णय घेत आहेत असे म्हटले जात आहे.
महाराष्ट्रामध्ये १५ डिसेंबरअखेर २४ लाख टनाचे साखर उत्पादन झाले. गेल्यावर्षी या कालावधीत ३३ लाख टन साखर तयार झाली होती. कर्नाटकातही १७ लाख टन साखर उत्पादन यंदा झाले आहे. गेल्यावर्षी हे उत्पादन २० लाख टन होते. दोन्ही राज्यांची एकत्रित तूट सुमारे १५ लाख टनांवर जाण्याची शक्यता आहे. यंदा १५ डिसेंबरअखेर देशात ७४ लाख टन साखर उत्पादन झाले आहे. इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने सांगितले की, १५ डिसेंबरअखेर उत्तर प्रदेशात २२ लाख टन साखर उत्पादन झाले. गेल्यावर्षी याच कालावधीत २० लाख टन साखर निर्मिती झाली होती. यंदा उत्तर प्रदेशामध्ये आतापर्यंत दोन लाख टन जादा साखर उत्पादन झाले आहे. उत्तर प्रदेशात गेल्यावर्षीपेक्षा अधिक साखर उत्पादन होईल, अशी शक्यता आहे. मात्र, त्या तुलनेत महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये यंदा असणारी पिछाडीच केंद्राला पुरेशा साखर निर्मितीबाबत भयभीत करत आहे.