नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या खाद्य मंत्रालयाने जून २०२१ या महिन्यासाठी देशातील ५५५ कारखान्यांना २२ लाख टन साखर कोटा विक्रीसाठी मंजूर केला आहे. याबाबत ३१ मे रोजी अधिसूचना जारी करण्यात आली आहे.
या महिन्यासाठीही गेल्या महिन्याच्या तुलनेत समान कोटा विक्रीसाठी मंजुरी मिळाली आहे. खाद्य मंत्रलयाने मे २०२१ मध्ये २२ लाख टन साखर विक्री कोट्यास मंजुरी दिली होती. तर जून २०२०च्या तुलनेत या महिन्यात जादा साखर विक्रीस परवानगी मिळाली आहे. सरकारने जून २०२० मध्ये १८.५० लाख टन साखर कोटा मंजूर केला होता.
बाजारातील तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, कोरोनाच्या रुग्णसंख्येत गतीने वाढ झाल्याने विविध राज्यांमध्ये लॉकडाउनची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे बाजारावर दबावाची स्थिती पाहायला मिळते. काही राज्यांमध्ये मॉन्सूनपूर्व पाऊस झाल्यामुळे साखर कारखानदारांना विक्रीत दबावाचा सामना करावा लागू शकतो.
केंद्र सरकार दर महिन्याला साखरेचा पुरवठा नियंत्रित करणे आणि दरामध्ये स्थिरता राखण्यासाठी मासिक कोटा पद्धतीने साखर विक्रीला परवानगी देते.