केंद्र सरकारकडून डिसेंबर २०२२ साठी २२ लाख टन साखर विक्री कोटा मंजूर केला आहे. याबाबात अन्न मंत्रालयाने ३० नोव्हेंबर २०२२ रोजी जारी केलेल्या अधिसूचनेत डिसेंबरसाठी देशातील ५५८ कारखान्यांना २२ लाख टन साखर विक्री कोटा दिला आहे.
गेल्या महिन्याच्या तुलनेत आताही तेवढाच साखर कोटा मंजूर झाला आहे. अन्न मंत्रालयाने नोव्हेंबर २०२२ साठी २२ लाख टन साखर विक्री कोटा मंजूर केला होता. दुसरीकडे, डिसेंबर २०२१ च्या तुलनेत यावेळी जास्त साखर वाटप करण्यात आली आहे. सरकारने डिसेंबर २०२१ साठी २१.५० लाख टन साखरेचा कोटा मंजूर केला होता. केंद्र सरकारच्या अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाने ट्विटद्वारे दिलेल्या माहितीनुसार, ‘देशातील स्थिर किमतीवर साखरेची मागणी पूर्ण करण्यासाठी सरकारने डिसेंबर २०२२ साठी २२ एलएमटी साखरेचा मासिक विक्री कोटा जारी केला आहे.’
दरम्यान, बाजारातील निरीक्षकांच्या मते, गेल्या महिन्यात मंजूर केलेला कोट्याच्या तुलनेत समान कोटा मंजूर केला असला तरी याचे प्रमाण खूपच विषम असल्याचे दिसून येते. साखरेची प्रमुख उत्पादक राज्ये असलेल्या उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्राला गेल्या महिन्याच्या तुलनेत कमी कोटा देण्यात आला आहे. दुसरीकडे कर्नाटकला अधिक कोटा देण्यात आला आहे.
केंद्र सरकारने साखरेच्या अतिरिक्त पुरवठ्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि दरात स्थिरता निश्चित करण्यासाठी मासिक वितरण व्यवस्था लागू केली आहे.