नेवासा : केंद्र आणि राज्य सरकारने पुढाकार घेऊन साखरेची एमएसपी ३१ रुपयांवरून ४२ रुपये प्रती किलो करावी आणि इथेनॉलच्या दरात प्रती लिटर १० रुपयांची दरवाढ करावी, अशी मागणी लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष तथा माजी आमदार नरेंद्र घुले पाटील यांनी केले. तालुक्यातील भेंडा येथे लोकनेते कारखान्याची ५३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी कारखाना कार्यस्थळावर झाली. त्यावेळी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. जिल्हा बँक व कारखान्याचे संचालक, माजी आमदार चंद्रशेखर घुले-पाटील, उपाध्यक्ष माजी आमदार पांडुरंग अभंग, ज्येष्ठ संचालक अॅड. देसाई देशमुख, काकासाहेब नरवडे, डॉ. क्षितिज घुले पाटील, माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, दिलीपराव लांडे आदींसह संचालक व्यासपीठावर उपस्थित होते.
अध्यक्ष घुले-पाटील म्हणाले की, इथेनॉल प्रकल्पाची पूर्वीची क्षमता प्रतीदिन ५० हजार लिटर गोती. प्रकल्पाचे विस्तारीकरण करून ती आता प्रती दिन १ लाख ४२ हजार लिटर केली आहे. प्रत्येक गळीत हंगामामध्ये १३ लाख ५० हजार मेट्रिक टन उसाचे गाळप करून ३ कोटी लिटर इथेनॉलची निर्मिती आणि साडेपाच कोटी युनिट विजेची निर्यात होणे गरजेचे आहे. कारखान्याने १३७ कोटींच्या इथेनॉल प्रकल्पाची उभारणी पूर्ण केली असून त्यातून प्रतिदिन १ लाख ५० हजार लीटर इथेनॉलची निर्मिती होईल. ज्ञानेश्वर कारखान्याची मालमत्ता आता ७०० कोटींची झालेली आहे. यावेळी ‘व्हीएसआय’च्या विश्वस्तपदी निवड झाल्याबद्दल कारखान्याचे अध्यक्ष माजी आ. नरेंद्र घुले पाटील यांच्या अभिनंदनाचा ठराव जनार्दन पटारे यांनी मांडला, त्यास डॉ. शिवाजी शिंदे यांनी अनुमोदन दिले. संचालक काकासाहेब नरवडे, माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, अंकुश काळे, अशोकराव मिसाळ, रामदास कोरडे, कॉ. आप्पासाहेब वाबळे, अशोकराव उगले, रामनाथ राजपुरे यांनी मनोगत व्यक्त केले.