नवी दिल्ली : २०२५ पर्यंत पेट्रोलमध्ये किमान २० टक्के इथेनॉल मिश्रणाचे उद्दीष्ट केंद्र सरकार पूर्ण करणार आहे अशी घोषणा केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राज्यसभेत केली. यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत, असे त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. सरकारने यासाठी २०३० हे वर्ष निश्चित केले होते. मात्र, आता पुढील चार वर्षात २० टक्क्यांची उद्दीष्टपूर्ती करू असे ते म्हणाले.
या उद्दीष्टपूर्तीसाठी सरकार हरेक प्रयत्न करीत असल्याचे सांगून मंत्री प्रधान म्हणाले, यापूर्वी इथेनॉलच्या वापराबाबत गांभीर्याने लक्ष दिले गेले नाही. त्यामुळे देशात कच्च्या तेलाच्या आयातीत प्रचंड वाढ झाली. पेट्रोलसोबत इथेनॉल मिश्रणाचे प्रमाण वाढविण्यासाठी सरकार आता गांभीर्याने प्रयत्न करीत आहे.
एकदा पेट्रोलमध्ये इथेनॉलचे प्रमाण वाढविल्यानंतर कच्च्या तेलाच्या आयातीमध्ये घसरण होईल आणि त्यातून स्थानिकांनाही रोजगार संधी वाढतील असे मंत्री प्रधान यांनी सांगितले. यातून देशातील ऊस उत्पादन वाढविण्याची संधी मिळेल. आणि शेतकऱ्यांचे उत्पन्नही वाढेल. याशिवाय तांदूळ आणि मक्क्यापासून इथेनॉल उत्पादनाचे प्रयत्न सुरू आहेत. आगामी काळात यासाठी सकारात्मक उपाययोजना केली जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.