नवी दिल्ली : बारामतीतील अग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट, मायक्रोसॉफ्ट, ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि कृषी विज्ञान केंद्र यांच्या वतीने गेल्या तीन वर्षांपासून कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित आधुनिक ऊस शेतीच्या प्रयोगाचे सोमवारी कृषिमंत्री चौहान आणि पंतप्रधानांच्या कार्यालयातील अधिकाऱ्यांसमवेत झालेल्या बैठकीत सादरीकरण करण्यात आले. या आधुनिक ऊसशेतीच्या क्रांतिकारक संशोधनाला पंतप्रधानांच्या कार्यालयाने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान आणि पंतप्रधानांच्या कार्यालयाने या संशोधनाचे सादरीकरण बघितल्यानंतर बारामतीमध्ये प्रत्यक्ष पाहणी करून हा प्रयोग देशभर राबविण्याचे निश्चित केले आहे.
अग्रोवनमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, कृषिमंत्री चौहान तसेच पंतप्रधानांच्या कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने बारामती येथे प्रत्यक्ष भेट देऊन हा प्रयोग बघण्याचे ठरविले आहे. प्रत्येक क्षेत्रात सध्या कृत्रिम तंत्रज्ञानाचा वापर केला जात असून कृषिक्षेत्र त्यापासून दूर राहू शकत नाही. हा अतिशय स्तुत्य उपक्रम असून तो देशभर राबविण्यात येईल, अशी ग्वाही चौहान यांनी दिली. या तंत्रज्ञानामुळे ऊस उत्पादनात ४० टक्क्यांपर्यंत वाढ, उत्पादन खर्चात २० ते ४० टक्क्यांपर्यंत घट, तीस टक्के पाणी बचत, रासायनिक खतांच्या वापरात २५ टक्के घट, कापणी कार्यक्षमतेत ३५ टक्क्यांपर्यंत सुधारणा, औषधांच्या वापरात २५ टक्के बचत झाल्याची माहिती यावेळी देण्यात आली. अॅग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचे विश्वस्त प्रतापराव पवार, भारतीय कृषी संशोधन परिषदेचे महासंचालक डॉ. मांगीलाल जाट, एडीटी बारामतीचे सीईओ नीलेश नलावडे, सिद्धेश्वर शिंपी, सेंटर ऑफ एक्सलन्स एआय बारामतीचे समन्वयक डॉ. योगेश फाटके, ‘मॅप माय क्रॉप’चे संचालक स्वप्नील जाधव व राजेश शिरोळे, ‘मॅप माय क्रॉप’चे कृषितज्ज्ञ भूषण गोसावी, मायक्रोसॉफ्टच्या कृषितज्ज्ञ सपना नौहरिया, अभिषेक बोस, अजय बारुन, संदीप अरोरा बैठकीत उपस्थित होते.