नवी दिल्ली : उसाच्या खरेदी दरात ८ टक्के वाढ करण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. उसाच्या दरात २५० रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे उसाचा खरेदी दर प्रती टन ३,१५० वरुन ३,४०० रुपयांवर करण्यात आला आहे. १ ऑक्टोबर २०२४ पासून नवा दर लागू होणार आहे. १०.२५ टक्के रिकव्हरीसाठी हा दर लागू असेल अशी माहिती केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीनंतर केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी या निर्णयांची माहिती दिली.
मोदी सरकारच्या या निर्णयाचा देशातील लाखो शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. साखर कारखान्यांनी हंगाम २०२४-२५ (ऑक्टोबर-सप्टेंबर) साठी देय असलेल्या उसाच्या ‘वाजवी आणि लाभदायक किंमत’ (एफआरपी) ला मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक घडामोडींच्या मंत्रिमंडळ समितीने उसाच्या रास्त आणि लाभदायक किमतीला १०.२५ % साखर पुनर्प्राप्ती दराने ३४० रुपये प्रती क्विंटल या दराने मंजुरी दिली. हा उसाचा ऐतिहासिक भाव आहे, जो चालू हंगाम २०२३-२४ च्या उसाच्या एफआरपीपेक्षा सुमारे आठ टक्क्यांनी जास्त आहे.
केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले की, साखर कारखान्यांमार्फत शेतकऱ्यांना ऊसाची किंमत योग्य आणि लाभदायक किंमत निश्चित करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. हा दर १ ऑक्टोबर २०२४ ते ३० सप्टेंबर २०२५ या ऊसाचा हंगामासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्यावर्षी उसाचा दर ३१५ रुपये होता. यावेळी यामध्ये २५ रुपये प्रती क्विंटल वाढ करण्यात आली आहे. या नव्या धोरणाचा लाखो शेतकऱ्यांना फायदा होईल.