नवी दिल्ली : केंद्र सरकार साखरेच्या किमान विक्री मूल्यात वाढ करण्याच्या शक्यतेवर सरकार विचार करीत आहे. एका कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना केंद्रीय अन्न मंत्री प्रल्हाद जोशी यांनी यासंदर्भात माहिती दिली. याबाबत, मंत्री म्हणाले की, सरकार साखरेची किमान निर्यात किंमत वाढविण्याच्या शक्यतेवर विचार करीत आहे. या संदर्भात साखर कारखाने आणि इतर मंत्रालयाशी चर्चा चालू आहे. मात्र हा निर्णय कधी घेतला जाईल, याबद्दल माहिती सांगण्यास त्यांनी असमर्थता दर्शविली. केंद्र सरकारने यापूर्वी साखरेचे किमान निर्यात मूल्य फेब्रुवारी २०१९ मध्ये ३१ रुपये प्रति किलो ठरविले होते.
गेल्या वर्षी कमी पावसामुळे साखरेचे उत्पादन कमी झाले होते. मात्र यावर्षी देशात पुरेसा पाऊस झाला आहे. त्यामुळे २०२४-२५ या साखर हंगामामध्ये साखरेचे उत्पादन वाढणार आहे. २०१९ पासून साखरेचा विक्री दर न वाढल्याने साखर कारखान्यांनी वेळोवेळी या दरात वाढ करण्याची मागणी सरकारकडे केली. यांदरम्यानच्या काळात उसाच्या किमान आधारभूत किमती वाढल्या आहेत. त्यामुळे साखर कारखान्यांचा उत्पादन खर्च वाढला आहे. अशा स्थितीत साखरेचे दर वाढविण्याची गरज असल्याचे साखर कारखान्यांनी सरकारला सांगितले आहे. दरम्यान, सरकार २०२४-२५ या वर्षाकरिता इथेनॉलच्या दरात वाढ करण्याच्या शक्यतेवर विचार करीत असल्याचेही अन्नमंत्री प्रल्हाद जोशी यांनी सांगितले. सध्या उसाच्या रसापासून तयार केलेल्या इथेनॉलची किंमत ६५ रुपये ६१ पैसे लिटर आहे. तर मळीपासून तयार केलेल्या इथेनॉलची किंमत ५६ रुपये २८ पैसे ते ६० रुपये ७३ पैसे लिटर आहे.