देशांतर्गत बाजारपेठेत दरवाढ रोखण्यासाठी जगातील सर्वात मोठा निर्यातदार भारत विविध प्रकारच्या तांदळाच्या निर्यातीवर निर्बंध लागू करू शकतो. जर असे झाले तर आधीच अल निनोच्या प्रभावामुळे महागाईशी झुंज देणाऱ्या जगभरातील देशांमध्ये तांदळाच्या किमती आणखी वाढू शकतात. जागतिक तांदूळ निर्यातीमध्ये भारताचा हिस्सा ४० टक्क्यांपेक्षा अधिक आहे हे विशेष.
अमर उजालामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, केंद्र सरकार सर्व प्रकारच्या गैर बासमती तांदळाच्या निर्यातीवर निर्बंध लागू करू शकते असे ब्लूमबर्गच्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे. याबाबत कोणतीही अधिकृत अधिसूचना जारी करण्यात आली नसली तरी केंद्र सरकार पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीपूर्वी कोणताही धोका स्वीकारण्यास तयार नाही. त्यामुळे गैर बासमती तांदळाच्या निर्यातीवर निर्बंध लागू करण्याचा विचार सुरू आहे.
सरकारने बुधवारी जारी केलेल्या आकडेवारीनुसार जून महिन्यात किरकोळ महागाईचा दर तीन महिन्याच्या उच्च स्तरावर, ४.८१ टक्क्यांपर्यंत पोहोचला. तांदूळ निर्यातीवर जर सरकारने निर्बंध लागू केले तर भारताच्या एकूण ८० टक्के तांदूळ निर्यातीवर परिणाम होईल. जगातील निम्म्या लोकसंख्येचे भात हेच मुख्य भोजन आहे. आशियाच्या जागतिक पुरवठ्यात जवळपास ९० टक्के तांदळाचा वापर केला जातो. अल निनोमुळे आधीच तांदळाचे दर ११ वर्षांच्या उच्चांकावर पोहोचले आहेत.