नवी दिल्ली : उन्हाळ्याच्या कालावधीत साखरेची वाढती मागणी गृहित धरून केंद्र सरकारने मंगळवारी आणखी २ लाख टन साखर कोटा मंजूर केला आहे. त्यामुळे एप्रील २०२३ या महिन्यासाठी देशातील साखर कारखान्यांना वितरणासाठी एकूण २४ लाख टनाचा कोटा मिळाला आहे.
गेल्या दोन आठवड्यात देशभरात साखरेच्या किमतीत ६ टक्क्यांपेक्षा अधिक वाढ झाली आहे. याबाबत रॉयटर्सने उद्योग विभागाच्या अधिकाऱ्यांच्या हवाल्याने म्हटले आहे की, उत्पादन घटणार असल्याचे स्पष्ट झाल्याने साखरेच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यातच उन्हाळ्याच्या या दोन महिन्यांत साखरेची मागणी आणखी वाढेल.
दरम्यान, साखरेच्या देशांतर्गत किमती वाढल्याचा फायदा दालमिया भारत शुगर, बलरामपूर शुगर, द्वारिकेश शुगर आणि श्री रेणुका शुगर्स आदी साखर कंपन्यांना मिळेल. त्यांच्या मार्जिनमध्ये वाढ होईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यातून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना वेळेवर बिले देण्यास मदत होईल असे याबाबतच्या अहवालात म्हटले आहे. मात्र, साखरेच्या दरवाढीमुळे अन्नधान्याच्या महागाईत वाढ होऊ शकते. केंद्र सरकारने मंगळवारी बाजारात अतिरिक्त २ लाख टनांचा कोटा खुला करण्याच्या घेतलेल्या निर्णयामुळे काही प्रमाणात दरवाढीला आळा घातला जाईल, असे या उद्योगातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे.