नवी दिल्ली : पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप पुरी म्हणाले की, 2025 च्या मध्यापर्यंत देशांतर्गत विमान उड्डाणामध्ये 1 टक्के शाश्वत विमान इंधन (SAF) वापराचे उद्दिष्ट पूर्ण केले जाईल. मंत्री पुरी यांनी सांगितले कि, आज मला देशात उत्पादित शाश्वत विमान इंधनाद्वारे (SAF) संचालित पुणे ते दिल्ली या पहिल्या व्यावसायिक उड्डाण करणाऱ्या विमानाचे क्रू मेंबर्स आणि प्रवासी भेटले. शाश्वत विमान इंधन (SAF) उत्पादनाच्या नवीन अध्यायाची ही सुरुवात आहे. आज, आम्ही एका फ्लाइटमध्ये SAF च्या 1 टक्के मिश्रणासह सुरुवात केली आहे, जी 2025 च्या मध्यापर्यंत सर्व फ्लाइटमध्ये 1 टक्क्यांपर्यंत नेली जाईल.
पुरी म्हणाले, सध्या 1 टक्के मिश्रण यशस्वी झाल्यानंतर ते पुढे 5 टक्क्यांपर्यंत आणू.हा नियम लागू झाल्यानंतर सर्व उड्डाणे 1 टक्के SAF इंधनावर होतील. 2025 पर्यंत जेट इंधनामध्ये 1 टक्के SAF मिश्रणाचे उद्दिष्ट पूर्ण झाल्यानंतर भारताला दरवर्षी सुमारे 14 कोटी लिटर SAF ची आवश्यकता भासेल. जर आम्ही 5 टक्के SAF मिश्रणाचे लक्ष्य ठेवले तर भारताला दरवर्षी सुमारे 70 कोटी लिटर SAF आवश्यक भासेल, असेही त्यांनी सांगितले. सस्टेनेबल एव्हिएशन फ्युएल (SAF) हा पारंपारिक जेट इंधनाचा एक स्वच्छ आणि अधिक टिकाऊ पर्याय आहे, जो कार्बन उत्सर्जन 80 टक्क्यांपर्यंत कमी करतो. मंत्री हरदीप सिंग पुरी म्हणाले, या ऐतिहासिक प्रसंगाचा साक्षीदार होताना आणि SAF मिश्रित ATF द्वारे इंधन भरलेले पहिले व्यावसायिक उड्डाण होताना बघताना मला आनंद होत आहे. SAF 1 टक्क्यांपर्यंत मिसळणारे प्रायोगिक तत्वावरील हे पहिले देशांतर्गत व्यावसायिक प्रवासी उड्डाण आहे.
इंडियन ऑइल, एअर एशिया आणि प्राज इंडस्ट्रीज या देशांतर्गत दिग्गजांचे अभिनंदन करून पुरी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर भारताच्या संकल्पनेचा पुनरुच्चार केला. यावेळी इंडियन ऑइलचे अध्यक्ष एस.एम.वैद्य, एअर एशियाचे व्यवस्थापकीय संचालक आलोक सिंग उपस्थित होते.