सातारा : साखर कारखानदारांनी यंदा गाळप होणाऱ्या उसाला पहिली उचल ४,००० रुपये जाहीर करावी. या मागणीकडे दुर्लक्ष केल्यास गावागावात होणाऱ्या कारखानदार व उमेदवारांच्या सभा उधळवून लावू, असा इशारा शेतकरी संघटनेचे नेते शंकरराव गोडसे यांनी येथे दिला आहे. आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी मागील वर्षीची शिल्लक रक्कम द्यावी अशी मागणी त्यांनी केली. मागील वर्षी गळीत झालेल्या उसाला ३१०० रुपये देण्याचे साखर आयुक्तांकडे झालेल्या बैठकीत कारखानदारांनी मान्य केले होते. साखर आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांनी तसे आदेश काढले. मात्र, त्याकडे चालढकल करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.
गोडसे यांनी सांगितले की, गेल्यावर्षी जिल्ह्यातील काही कारखान्यांनी २८०० ते तीन हजार रुपये दिले आहेत. कारखानदारांनी गाळप हंगामापूर्वीच शेतकऱ्यांना उर्वरित रक्कम दिली पाहिजे. यंदा प्रती टन चार हजार रुपयांची पहिली उचल देणे आवश्यक आहे. यंदा वर्षभर साखरेचा दर चाळीस रुपयांहून अधिक आहे. त्यामुळे कारखानदारांना एवढा दर देणे अवघड नाही. यंदा रास्ता रोको, ट्रॅक्टरचे नुकसान करणे यासारखी रस्त्यावर उतरून आंदोलने करणार नाही. तर संबंधित उमेदवार, कारखान्यांचे अध्यक्ष, संचालकांना गावात फिरू देणार नाही.