स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून राष्ट्रीय महामार्गावर चक्का जाम, वाहतूक ठप्प

कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आज (23 नोव्हेंबर) पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर चक्का जाम केल्याने वाहतूक ठप्प झाली. ‘स्वाभिमानी’चे नेते व माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली पंचगंगा नदीच्या पुलावर ठिय्या आंदोलन सुरू असून सुमारे तीन तासापासून महामार्ग ठप्प आहे. मागील हंगामातील उसाचे 100 रुपये कारखान्यांनी तातडीने जाहीर करावेत, अन्यथा महामार्गावरून हटणार नाही, असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला. आंदोलन सुरू करण्यापूर्वी राजू शेट्टी यांनी श्री करवीर निवासिनी अंबाबाई देवीचे दर्शन घेतले.

 शेट्टी म्हणाले, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनादरम्यान मंत्री हसन मुश्रीफ सतत संपर्कात होते. मात्र, कोणतेही आंदोलन न करता तातडीने मार्ग काढावा, असे मंत्री मुश्रीफ सांगत होते. गेल्या दीड महिन्यापासून आमचे आंदोलन सुरू आहे. आम्ही तीन पावले मागे येत गेल्या हंगामातील उसासाठी 400 रुपयांऐवजी आम्ही 100 रुपये मागत आहोत, पण तरीही तुम्ही आमची मागणी मान्य केली जात नाही. त्यामुळे आता मागणी होईपर्यंत आम्ही मागे हटणार नाही, असा इशारा शेट्टी यांनी यावेळी दिला.

 आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर पोलिसांनी राष्ट्रीय महामार्ग 4 वरील वाहतूक अन्य मार्गांनी वळवली. दोन्ही मार्गावरील वाहतूक बंद केल्याने सुमारे चार तास वाहतूक विस्कळीत झाली होती. प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून वाहतुकीचा मार्ग बदलण्यात आला असून पुण्याहून कर्नाटकच्या दिशेने जाणारी वाहतूक शिये-कसबा बावडा-कावळा नाका-उजळाई उड्डाणपूल मार्गे कर्नाटकच्या दिशेने वळवण्यात आली आहे. तर कर्नाटककडून येणारी वाहतूक लक्ष्मी टेकडी-हुपरी-इचलकरंजी-हातकणंगले-जयसिंगपूर-पेठ नाक्याकडे वळवण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here