कोल्हापूर : मार्चपासून फैलावलेल्या कोरोना आणि त्यामुळे झालेल्या लॉक डाऊन चा परिणाम साखर उद्योगावर झाला आहे. यंदा गाळप हंगामासमोर ऊस तोडणी -ओढणी मजूर उपलब्धतेचे आव्हान रहाणार असल्याचे मत बैठकीत व्यक्त करण्यात आले. प्रादेशिक साखर सहसंचालक एन. आर. निकम यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली. यावेळी कारखाना प्रतिनिधीं उपस्थित होते.
यंदाच्या गाळप हंगामाबाबत चर्चा करण्यासाठी ही बैठक घेण्यात आली. या वर्षी ऑक्टोबर पासून हंगाम सुरू होणार असला तरी नोव्हेंबरलाच ऊसाची मोळी गव्हाणीत पडेल, हे स्पष्ट आहे. पण यंदा कोरोना च्या पार्श्वभूमीवर मजुरांची उपलब्धता हे एक मोठे आव्हान सर्वांसमोर असल्याची खंत कारखानदारांनी व्यक्त केली.
कोल्हापूर जिल्ह्यात बीड, उस्मानाबाद, नाशिक, चाळीसगाव, मालेगाव, माजलगाव या भागातून तोडणी मजूर येतात. या सर्वच जिल्ह्यांत कोरोनाचा फैलाव वाढल्यामुळे या जिल्ह्यातून बाहेर जाण्याचे पास मिळत नाहीत. या कारणामुळे कित्येक कारखान्यांचे तोडणी-ओढणीचे करारही झालेले नाहीत. जिल्ह्यात बाहेरून येणाऱ्यांचे 14 दिवस अलगीकरण केले जात असल्याने मजूर मिळणे अवघड झाले आहे.
गाळप क्षमता कमी असलेल्या कारखान्यात तीन हजार मजूर बाहेरुन येतात. मोठ्या गाळप क्षमतेच्या कारखान्यात या मजूरांची संख्या बरीच मोठी असते. त्यामुळे यावर मार्ग काढण्याबाबत कारखानदारांनी आपले गाऱ्हाणे बैठकीत मांडले. त्यावर सर्व कारखानदारांच्यावतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला.
यावेळी नुकतेच कार्यभार स्विकारलेल्या श्री. निकम यांचे कारखानदारांच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. श्री. निकम यांनी कारखानानिहाय ऊसाची उपलब्धता, गेल्या हंगामातील थकीत एफआरपी, साखरेचा शिल्लक साठा, निर्यात साखर आदींचा आढावा घेतला.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.