पुणे: उसाच्या उत्पादकतेत वाढ करण्याचे मोठे आव्हान आपल्यापुढे आहे. त्यामुळे साखर कारखानदारी आणि ऊस उत्पादन क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञान आणण्यासाठी या क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांनी काम करावे, अशी अपेक्षा राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली.दी डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्टस् असोसिएशनच्या(डीएसटीए)69 व्या वार्षिक अधिवेशन आणि प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी दूरदृष्य प्रणालीद्वारे ते बोलत होते.
मंत्री विखे-पाटील म्हणाले कि, साखर कारखानदारी आणि सहकारी चळवळीचे नाते अभिन्न आहे. साखर उद्योगाने राज्याच्या आणि देशाच्या विकासात मोठे योगदान दिले आहे.साखर कारखानदारीच्या वाटचालीत ‘डीएसटीए’ने नेहमीच महत्त्वाची भूमिका बजावली आहे. देशाच्या इतिहासात पहिल्यांदा केंद्र शासनाने सहकार मंत्रालयाची स्थापना केली.वर्षानुवर्षे प्रलंबित असलेला साखर कारखान्यांचा आयकराचा प्रश्न सहकार मंत्रालयाने मार्गी लावला.इथेनॉल निर्मितीच्या माध्यमातून अधिक उत्पन्नाचा मार्ग दाखवला.या सहकार मंत्रालयाच्या माध्यमातून देशातील नवीन सहकारी साखर कारखाने, खासगी कारखाने यांच्यापुढील आव्हानांवर मार्ग शोधला जात आहे.
ऊस उत्पादनखर्च कमी करणे, उत्पादकता वाढविणे, शेतीत नवीन तंत्रज्ञानाचा वापर वाढवून उत्पादनात वाढ करणे आदी नवीन आव्हाने आहेत.आज केवळ साखर उत्पादनावर अवलंबून राहण्यासारखी परिस्थिती नाही.ज्यूस, सिरप, मळीपासून इथेनॉल निर्मितीच्या उत्पादनाचे क्षेत्र पुढे आले आहे, त्याचा साखर कारखान्यांनी फायदा घेतला पाहिजे. केंद्र शासनाच्या धोरणांतर्गत पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉल मिसळण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.त्यामुळे ऊसशेती, साखर उत्पादन, तसेच देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळणार आहे, असे प्रतिपादनही त्यांनी केले. कारखान्यांच्या आधुनिकीकरणासाठी तंत्रज्ञान विकसित करणे, ऊस तोडणीचा खर्च मोठा असून अजूनही परदेशातून हार्वेस्टर आयात करावे लागतात. त्यामुळे या सर्व बाबींमध्ये संशोधन करुन तंत्रज्ञान विकसित करण्याची गरज असून त्यावर काम करावे, असेही ते म्हणाले.
‘डीएसटीए’ने देशातील साखर कारखाने आधुनिक करुन त्यांना दिशा देण्याच्या कामात सिंहाचा वाटा उचलल्याचे राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे(एनएफसीएफएस)अध्यक्ष, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील म्हणाले.केंद्र शासनाने सहकार मंत्रालय स्थापन केल्यामुळे सहकारी साखर कारखानदारीचे प्रश्न सुटण्यास मदत होईल.साखर कारखानदारीला चालना देण्यासाठी उपलब्ध सर्व संसाधनांना चालना देण्याचे काम करावे लागेल.देशातील अनेक संस्था साखर कारखानदारी आणि या क्षेत्राशी निगडीत असून त्यांना एका व्यासपीठावर आणण्यासाठी एनएफसीएफएस काम करेल, असेही ते म्हणाले. यावेळी आमदार अरुण लाड, साखर आयुक्त डॉ. कुणाल खेमनार, माजी मंत्री दिलीपराव देशमुख, ‘एनएफसीएफएस’चे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे, ‘डीएसटीए’चे अध्यक्ष एस.बी.भड, उपाध्यक्ष(तांत्रिक) एस.डी.बोखारे आदी उपस्थित होते.