नवी दिल्ली : रशिया व युक्रेन यांच्यातील युद्धात आणखी तेजी येण्याची शक्यता असल्याने पुढील काळ आव्हानात्मक आहे. त्यामुळे आपण नव्या बाजारपेठा शोधण्यासह तेथे व्यापाराच्या शक्यता पडताळण्याची गरज आहे, असे प्रतिपादन वाणिज्य व उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी केले. फेडरेशन ऑफ इंडियन एक्स्पोर्ट ऑर्गनायझेशन (फियो) च्या कार्यक्रमात ते निर्यातदारांशी संवाद साधत होते. गोयल यांच्या या आवाहनाने चालू आर्थिक वर्ष, २०२३-२४ मध्ये वस्तूंची निर्यात चांगल्या स्थितीत असणार नाही, हे स्पष्ट झाले आहे. वाणिज्य विभागाने चालू आर्थिक वर्षासाठी निर्यातीचे कोणतेही उद्दिष्ट अद्याप निश्चित केलेले नाही. गेल्या आर्थिक वर्षात, २०२२-२३ मध्ये निर्यात ४४७ अब्ज डॉलरवर पोहोचली होती. आधीच्या आर्थिक वर्ष २०२१-२२ च्या तुलनेत ही निर्यात जवळपास ६ टक्क्यांनी अधिक झाली आहे.
दैनिक जागरणमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, वाणिज्य मंत्रालयातील एका अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, चालू आर्थिक वर्षात गेल्या वर्षीइतके म्हणजे ४४७ अब्ज डॉलरची निर्यात करणेही शक्य होण्याची स्थिती नाही. गेल्या आर्थिक वर्षात, २०२२-२३ मध्ये वस्तू आणि सेवा या दोन्ही घटकांची एकत्रित निर्यात ७७३ अब्ज डॉलर झाली. भारताच्या जीडीपीचा हा जवळपास २२ टक्के हिस्सा आहे. अशा स्थितीत निर्यातीवर परिणाम झाल्याने जीडीपीचा विकास दर घसरू शकतो.
भारत आपल्या एकूण वस्तूंच्या निर्यातीचा १७.५० टक्के हिस्सा अमेरिकेला निर्यात करतो. ही निर्यात मंदीच्या फेऱ्यात सापडणार असल्याचे दिसून येत आहे. अमेरिकेत महागाई उच्चांकी स्तरावर आहे. ती रोखण्यासाठी बुधवारी अमेरिकन फेडरल रिझर्व्हने व्याज दरात २५ अंकांची वाढ केली. युरोपची आर्थिक दशाही ठिक नाही. रशिया-युक्रेन युद्धानंतर युरोपातील बहुतांश देश गॅस आणि अन्न संकटाशी झुंज देत आहेत. त्यामुळे महागाई वाढण्यासह औद्योगिक उत्पादनही घटले आहे. त्यामुळे भारतीय वस्तू निर्यातीत २० टक्क्यांचा हिस्सा असलेल्या इंजिनीअरिंग गुड्समध्ये गेल्यावर्षी घसरण दिसून आली आहे.