मुंबई : राज्याचे नवे साखर आयुक्त म्हणून नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांची नियुक्ती करण्यात आली. राज्य शासनाचे अपर मुख्य सचिव (लेखा) नितीन गद्रे यांनी २ जून २०२३ रोजी चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या नियुक्तीचे आदेश काढला आहे. साखर आयुक्त शेखर गायकवाड हे ३१ मे २०२३ रोजी सेवानिवृत्त झाल्यानंतर सहकार आयुक्त अनिल कवडे यांच्याकडे १ जूनलाच साखर आयुक्त पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविला होता. श्री चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या नियुक्तीने राज्यातील राजकीय आणि सहकार वर्तुळात नवीन साखर आयुक्त पदी कोणाची वर्णी लागणार या चर्चेला तूर्तास पूर्णविराम लागला आहे.
पुलकुंडवार यांनी याअगोदर रस्ते विकास महामंडळाचे सरव्यवस्थापक संचालक म्हणून ते काम केले आहे. समृध्दी महामार्गांसाठीची भूसंपादन प्रक्रिया त्यांनी मोठ्या कौशल्याने हातळली. ते २००८ च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. त्यांनी यवतमाळ येथे उपजिल्हाधिकारी, पुनर्विकास अधिकारी म्हणून, मेळघाट येथे उपविभागीय अधिकारी, कृष्णा खोरे प्रकल्पात विशेष भूसंपादन अधिकारी, नांदेडमध्ये निवासी जिल्हाधिकारी, परभणीत उपविभागीय अधिकारी, अंधेरीत एमआयडीसीचे उपमहाव्यवस्थापक म्हणून काम बघितले. २००८ मध्ये महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाणांचे खासगी सचिव म्हणून, त्यानंतर तत्कालीन आरोग्य मंत्र्यांचे खासगी सचिव म्हणून काम पाहिले. प्रशासनाचा त्यांना दीर्घ अनुभव आहे.