बंगळूर : शनिवारी पहाटेचे दीड वाजल्याबरोबर इस्त्रोच नव्हे, तर जगभरातील शास्त्रज्ञ आणि खगोल प्रेमींबरोबरच भारतीयांच्या हृदयाचेही ठोके वाढत होते, उत्कंठा शिगेला पोचली होती…. आता चंद्राचा पृष्ठभाग केवळ २.१ किलोमीटर राहिला असताना विक्रम लँडरचा संपर्क तुटला. सिग्नल दिसणे बंद झाले. शास्त्रज्ञांमध्ये निराशेचे वातावरण पसरले. इस्रो प्रमुख के. सिवन भावूक झाले. के. सिवन आणि शास्त्रज्ञांशी पंतप्रधान मोदींनी संवाद साधला. ते म्हणाले, तुमचा देशाला अभिमान आहे. तुम्ही धीर सोडू नका. आयुष्यात चढ उतार येत असतात. पुढच्या वेळी यश नक्की मिळेल. मी तुमच्या सोबत आहे. अशा शब्दात मोदींनी शास्त्रज्ञांचा उत्साह वाढवण्याचा प्रयत्न केला.
भारताच्या चंद्रयान-२ मोहिमेविषयी जगभरात कुतूहल होते. पहाटे १.५३ वाजण्याच्या सुमारास चांद्रयान २ मोहिमेतील विक्रम नावाचे लँडर चांद्रभूमीवर उतरणार असल्यामुळे उत्सुकता शिगेला पोहोचली होती. चंद्राच्या पृष्ठभागापासून ३५ किलोमीटरवर असलेल्या विक्रम लँडरने पहाटे १.३० वाजता चंद्राच्या दिशेने वाटचाल सुरु केली. सर्व काही सुरळीत सुरु होते. मात्र, केवळ २.१ किलोमीटरचे अंतर बाकी असताना लॅडरचा संपर्क तुटला. पहाटे उशिरापर्यंत लँडरशी संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे मोहिमेच्या यशस्वी किंवा अयशस्वीतेविषयी उत्कंठा कायम राहिली. विक्रम लँडरच्या चंद्रस्पर्शाचा अभूतपूर्व क्षण डोळ्यात साठवून ठेवण्यासाठी कोट्यवधी नागरीकांनी दूरदर्शन सह मीडियाचा वापर केला.
पंतप्रधान मोदी स्वत: इस्रोच्या बंगळूर केंद्रात उपस्थित होते. त्यांच्या सोबत ७० विद्यार्थ्यानीही हा अभूतपूर्व सोहळा अनुभवला. लँडरचा संपर्क तुटल्यानंतर शास्त्रज्ञ निराश झाले होते, या शास्त्रज्ञांशी संवाद साधत मोदी यांनी सर्वांना धीर देऊन त्यांचा उत्साह वाढवला. प्रत्येक शास्त्रज्ञाशी हस्तांदोलन करुन देशाला तुमचा अभिमान असल्याचे सांगितले. इस्रो प्रमुख के. सिवन यांना मिठी मारुन त्यांचे सांत्वन केले. याबरोबरच मोदींनी काही काळ विद्यार्थ्याशी संवाद साधला.
चंद्रापासून ३५ किमी अंतरावर असलेले ‘विक्रम लँडर’ १५ मिनिटांत चंद्रस्पर्श करील. या प्रक्रियेला ‘इस्रो’चे अध्यक्ष डॉ. के. सिवन यांनी ‘१५ मिनिटांचा थरार’ असे संबोधले. ‘नवजात बाळ अचानक कुणी तुमच्या हाती सोपवावे, अशीच ही स्थिती आहे. हे बाळ इकडे-तिकडे दुडदुडेल. पण तुम्हाला त्याला सांभाळायचे आहे. ‘लँडर’ आमच्यासाठीही असेच बाळ आहे,’ असे के. सिवन म्हणाले.
‘चंद्रयान-२’ चा चंद्राच्या दिशेने प्रवास २२ जुलैला सुरू झाला होता, आतापर्यंतचे सर्व टप्पे व्यवस्थित पार पडले आहेत. या मोहिमेतील अचूकतेद्वारे भारताने अवकाश तंत्रज्ञानातील आपल्या क्षमतेचे दर्शन साऱ्या जगाला घडविले आहे. सन २०१६ मध्ये रशियाने लँडर देण्यात असमर्थता दर्शवल्यावर तीन वर्षांच्या विक्रमी काळात ‘इस्रो’ने स्वदेशी आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या जोरावर लँडर आणि रोव्हर विकसित केले. ‘चंद्रयान-२’ च्या रूपाने इस्रोने भारतीय भूमीवरून आतापर्यंतचे सर्वाधिक वजनाचे यशस्वी प्रक्षेपण केले आणि कोणताही अनुभव नसताना पूर्णपणे स्वयंचलित पद्धतीने लँडर आणि रोव्हरला चंद्रभूमीवर उतरवण्यासाठी प्रयत्न केले.
हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.