लखीमपुर खीरी : भारतीय किसान यूनियनचे (बीकेयू) नेते राकेश टिकेत यांनी केंद्रीय राज्यमंत्री अजय कुमार मिश्रा यांच्या हस्ते होणाऱ्या लखिमपूर कारखान्याच्या उद्घाटनास आक्षेप घेतला. जर मंत्र्यांच्या हस्ते लखीमपूरच्या कारखान्यांचे गळीताचे उद्घाटन करण्यात आले तर शेतकरी आपला ऊस जिल्हाधिकारी कार्यालयाला घेऊन जातील असा इशारा टिकैत यांनी दिला. खिरी जिल्ह्यातील बेलराया आणि संपूर्ण नगर येथील दोन सहकारी साखर कारखान्याच्या प्रशासनाने गळीत हंगामाच्या उद्घाटन कार्यक्रमात बदल केला. मिश्रा यांचा मुलगा ३ ऑक्टोबर रोजी लखिमपूर खिरीतील तिकुनिया येथील हिंसक घटनेतील मुख्य आरोपी आहे. यामध्ये चार शेतकरी, एका पत्रकारासह आठ जणांचा मृत्यू झाला होता. आशिष मिश्रा सध्या तुरुंगात आहे.
याबाबत जारी करण्यात आलेल्या आपल्या सुधारित कार्यक्रमात दोन्ही सहकारी सखर कारखान्याच्या व्यवस्थापकांनी सांगितले की खिरीचे जिल्हाधिकारी दोन्ही कारखान्यांचे प्रशासक आहेत. ते बेलरायामधील सरजू सहकारी साखर कारखाना आणि संपूर्ण नगरातील किसान सहकारी साखर कारखान्यात शेतकरी आणि शेअरधारकांच्या उपस्थितीत गळीत हंगामास प्रारंभ करतील. यापूर्वी गृह राज्यमंत्री अजय मिश्रा हे या दोन्ही कारखान्यातील गळीत हंगाम प्रारंभ कार्यक्रमाचे उद्घाटन करणार होते. लखनौत शेतकरी संघटनेच्या संयुक्त किसान मोर्चाने (एसकेएम) आयोजित केलेल्या शेतकरी महापंचायतमध्ये बोलताना टिकैत यांनी अजय मिश्रा टेनी यांच्या अटकेची मागणी केली. यादरम्यान, राज्यमंत्री अजय कुमार मिश्रा टेनी यांच्या जवळच्या काही स्थानिक भाजप नेत्यांनी सांगितले की, केंद्रीय मंत्री पूर्वनियोजित कार्यक्रमांमुळे जिल्ह्याबाहेर आहेत. त्यामुळे ते उद्घाटन समारंभास उपस्थित राहू शकत नाहीत.