महाराष्ट्र, गुजरातमधील स्वस्त गुळाचा उत्तर प्रदेशला बसतोय फटका

लखनौ : उत्तर प्रदेशातील उसावर पडलेल्या रोगाने यावेळी गुळाच्या दराला फटका बसला असून, महाराष्ट्र आणि गुजरातमधील उसावर रोगाचा प्रादुर्भाव नसल्याने आणि रिकव्हरी जास्त असल्याने तेथील गूळ उत्तर प्रदेशच्या तुलनेत कमी दरात तयार होत आहे. त्यामुळे गुळाच्या दरात सातत्याने घसरण सुरू आहे. दोन दिवसांतच भावात १५०० रुपयांनी घट झाली आहे. अशा परिस्थितीत ही मंदी ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण करू शकते. यंदा गुळाचा भाव सुरुवातीला ४५०० रुपये प्रतिक्विंटल होता. त्यामुळे क्रशर चालकही ३०० रुपये प्रती क्विंटलपेक्षा जादा दराने ऊस खरेदी करत होते. मात्र नंतर हळुहळू गुळाचे भाव उतरू लागले. त्याचा थेट परिणाम उसाच्या भावावर होऊ लागला.

उत्तर प्रदेशातील उसावर पोका बोरिंग, रेड रॉट, टॉप बोअरिंग आदी रोगांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे असे जागरणमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तामध्ये म्हटले आहे. या रोगांपासून पिक वाचवण्यासाठी शेतकरी भरमसाठ कीटकनाशकांचा वापर करत आहेत. तरीही रोगाला आळा घालणे शक्य होत नसल्याची स्थिती आहे. त्यातून उसाचा उतारा घटला आहे. गेल्या दोन महिन्यांत गुळाच्या दरात प्रती क्विंटल १५०० रुपयांची घसरण झाली आहे. परिणामी क्रशर चालकांनी उसाचे दर कमी केले आहेत. सध्या उसाला प्रती क्विंटल २७० रुपये दर दिला जात आहे. ऊस उत्पादक शेतकरी आपले शेत रिकामे करून गहू, वाटाणा पेरणीची तयारी करत आहे. मात्र, उसाला कमी भाव मिळाल्याने त्यांचे नुकसान होत आहे. जिल्ह्यातील दोन्ही साखर कारखान्यांकडे गेल्या वर्षभरात सुमारे दीडशे कोटी रुपयांची ऊस बिलांची थकबाकी आहे. त्यामुळे शेतकरी क्रशरकडे वळले आहेत. हापूरचे व्यापारी अमितकुमार गोयल म्हणाले की, महाराष्ट्र, गुजरातमध्ये सात क्विंटल उसापासून गुळ तयार होतो. येथे पावणेनऊ क्विंटल ऊस लागतो. उत्पादन खर्च कमी असल्याने त्या दोन राज्यांतून कमी दरात गुळ विकला जातो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here