छत्रपती संभाजीनगर : येथील प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयांतर्गत येणाऱ्या पाच जिल्ह्यांतील २२ कारखान्यांनी २० मार्चअखेर ९४ लाख २३ हजार ९५३ टन ऊस गाळप केले आहे. या कारखान्यांचा सरासरी साखर उतारा ८.८८ टक्के असून या ८३ लाख ६८ हजार ८१२ क्विंटल साखरेचे उत्पादन केले. पाचही जिल्ह्यांत गळीत हंगामात सहभागी होणाऱ्या कारखान्यांपैकी ११ कारखान्यांच्या हंगामाची समाप्ती झाली आहे. त्यामध्ये जळगाव- २, नंदुरबार- २, जालना- १, बीड – ३ व छत्रपती संभाजीनगर – ३ साखर कारखान्यांचा समावेश आहे.
पाच जिल्ह्यांतील १३ सहकारी कारखान्यांनी ४२ लाख ९१ हजार ४८७ टन उसाचे गाळप केले. सरासरी ८.२८ टक्के साखर उताऱ्यासह ३५ लाख ५३ हजार ५०१ क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. तर ९ खासगी कारखान्यांनी ५१ लाख ३२ हजार ४६५ उसाचे गाळप केले. सरासरी ९.३८ टक्के साखर उताऱ्यासह ४८ लाख १५ हजार ३११ क्विंटल साखरेचे उत्पादन केले. जालना जिल्ह्यात ऊस गाळपाअभावी शिल्लक राहण्याची शक्यता असून त्यासाठी नियोजन केल्याचे साखर विभागाकडून सांगितले जात आहे. यंदाच्या हंगामात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ६ कारखान्यांनी गाळपात सहभाग घेत १८ लाख ५१ हजार ७७२ टन उसाचे गाळप केले. सरासरी ९.६५ टक्के साखर उताऱ्यासह १७ लाख ८७ हजार ४९१ क्विंटल साखरेचे उत्पादन केले.