छत्रपती संभाजीनगर – १४ वर्षे बंद देवगिरी साखर कारखाना पुन्हा सुरू करण्याचे प्रयत्न : आमदार अनुराधा चव्हाण

छत्रपती संभाजीनगर : चौदा वर्षांपासून बंद असलेला देवगिरी सहकारी साखर कारखान्याच्या कर्जमुक्तीसाठी प्रयत्न केले जात आहेत. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे बैठका घेण्यात आल्या. त्यांच्याकडे कारखाना कर्जमुक्त करण्याचा प्रस्ताव दाखल करण्यात आला असून, लवकरच कारखाना अवसायनातून बाहेर काढून यंदा कारखान्याचा गळीत हंगाम सुरू करण्याकरिता प्रयत्न केले जात आहेत, अशी माहिती आमदार अनुराधा चव्हाण यांनी दिली. या कारखान्यावरील कर्ज फेडण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. लवकरच कारखाना अवसायनातून बाहेर निघेल, असे त्यांनी सांगितले.

फुलंब्री येथील देवगिरी सहकारी साखर कारखान्याचा पहिला गळीत हंगाम १९९२-९३ मध्ये सुरू झाला होता. काही वर्षांनंतर राजकीय हस्तक्षेप वाढल्याने येथील कारखाना बंद पडला. नुकत्या झालेल्या विधानसभा निवडणुकीत हा कारखाना सुरू करण्याचे आश्वासन सत्ताधारी व विरोधी पक्षाच्या नेत्यांनी दिले होते. आ. अनुराधा चव्हाण यांनी कारखाना सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. कारखान्याची आतापर्यंत १९५ एकर जमीन विक्री करण्यात आली आहे. या जमीन विक्रीपोटी १२४ कोटी ६५ लाख रुपये कारखान्यास मिळाले होते. यातून ७६ कोटी रुपयांची कर्जे भागविण्यात आली असली तरी आणखी काही थकबाकीबाबत तडजोड सुरू असल्याचे समजते. कामगार पगार व इतर खर्चानंतर कारखान्याकडे १२ कोटी रुपये शिल्लक आहेत. या रकमेतून कारखाना सुरू करण्यासंदर्भात प्रयत्न सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here