छत्रपती संभाजीनगर : धामोरी बुद्रुक (ता. गंगापूर) येथील मुक्तेश्वर साखर कारखान्याने चालू गळीत हंगाम २०२४-२५ मध्ये गाळप झालेल्या उसाला प्रतिटन २७०० रुपये पहिली उचल देण्याचा निर्णय व्यवस्थापन मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. मागील पंधरवड्यात गाळपासाठी आलेल्या उसाची रक्कम २७०० रुपये प्रतिटन शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली जाईल, अशी माहिती ज्येष्ठ संचालक रामचंद्र निरपळ यांनी दिली.
कारखान्याच्या सध्याच्या एफआरपीनुसार, प्रतिटन २४०० रुपये इतका दर बसत आहे. यामध्ये प्रतिटन ३०० रुपये अधिकचे दिले जाणार असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मणराव गाडे यांनी सांगितले. १६ जानेवारी २०२५ पासून पुढे गाळप झालेल्या उसाची रक्कम लवकरच सत्तावीसशे रुपये प्रतिटनप्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करणार असून, यापूर्वी गाळपासाठी देण्यात आलेल्या उसालाही फरकाची १०० रुपये प्रतिटन गाळप हंगाम संपल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी शेतकी अधिकारी नंदकुमार कुंजर, अभियंता प्रमोद काळे, रसायनतज्ज्ञ पंडित गोरडे, अभियंता दिगंबर अडकिने, सखाराम मोरे व हिशेबनीस रामेश्वर म्हस्के आदींची प्रमुख उपस्थिती होती.