छत्रपती संभाजीनगर : श्री संत एकनाथ सहकारी साखर कारखाना – सचिन घायाळ शुगर प्रा. लि. कारखान्याने उसाचा साखर उतारा लक्षात घेता सर्व शेतकऱ्यांसाठी समाधानकारक भावाचे सूत्र ठरविले आहे. गळीत हंगामाच्या सुरूवातीच्या काळात ऊस अपरिपक्व असल्याने साखर उतारा कमी असतो, परंतु जसे-जसे उसाचे वय वाढून ऊस परिपक्व होतो त्याप्रमाणात ऊसात साखरेचा उतारा वाढतो. या सुत्रांच्या आधारावर हंगाम २०२४-२५ मध्ये उसाला पंधरवाडानिहाय ऊसदर जाहीर करण्यात आलेला आहे. चेअरमन सीए सचिन घायाळ यांनी ही माहिती दिली. यंदाही मकर संक्रातीला १२,२२२ सभासदांना व ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रत्येकी दहा किलो साखरेचे वाटप केले आहे.
सचिन घायाळ यांनी सांगितले की, गळीत हंगाम सुरू ते १५ जानेवारीपर्यंत २६०० रुपये प्रति मे. टन दिला आहे. तर १६ ते ३१ जानेवारीपर्यंत २६५० रुपये प्रति मे. टन दर दिला. आता १ ते १५ फेब्रुवारीपर्यंत २७०० रुपये प्रति मे. टन दर देण्यात येणार आहे. तर १६ ते २८ फेब्रुवारीपर्यंत २७२५ रुपये प्रति मे. टन दर असेल. तर १ ते १५ मार्च २७५० रु. प्रति मे.टन आणि १६ मार्च ते १५ एप्रिल २८०० रू. प्रति मे. टन असा दर कारखाना दिला जाईल. गळीतास येणाऱ्या उसाला परिसरातील इतर कारखान्यांच्या तुलनेत उच्चांकी भाव देण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांनी हार्वेस्टर मशिनला ऊस न देता कारखान्याच्या टोळ्यांना ऊस द्यावा. कारखान्याने उपपदार्थ निर्मिती नसूनसुद्धा एवढा उच्चांकी भाव जाहीर केल्याबद्दल ऊस उत्पादक शेतकरी रखमाजी मिसाळ, विजय बोबडे, कैलास फासाटे, शरद जाधव, बाबासाहेब बोबडे, दादासाहेब लिपाणे यांनी चेअरमन सी.ए. सचिन घायाळ यांचे आभार मानले.