छत्रपती संभाजीनगर : कन्नड तालुक्यातील कानडगाव येथे एका शेताला लागलेल्या आगीत तीन एकर ऊस आणि एक एकरमधील शेडनेट जळून खाक झाले. बुधवारी ही घटना घडली. यामध्ये जवळपास १० लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे. पुरुषोत्तम नलावडे असे या नुकसानग्रस्त शेतकऱ्याचे नाव आहे. अज्ञात व्यक्तीने ही आग लावल्याचा आरोप करण्यात आला आहे.
कानडगाव (क) शिवारातील गट क्रमांक १३६ मध्ये पुरुषोत्तम नलावडे यांच्या उसाला आग लागली. नलावडे यांचा ऊस १२ महिन्यांचा होता. तीन एकरातील ऊस त्यांनी रसवंतीसाठी ठेवला होता. नलावडे हे घराकडे गेले असता कुणीतरी अज्ञाताने ऊसाला आग लावली. आग दिसताच नागरिकांनी आरडाओरड केली. ग्रामस्थांनी आग रोखण्यासाठी प्रयत्न केला. मात्र, नागरिकांचे प्रयत्न निष्फळ ठरले. आगीत शेडनेटमधील एक एकरातील टोमॅटोदेखील होरपळून खराब झाले.