छत्रपती संभाजीनगर : महालगाव परिसरातील पंचगंगा साखर कारखान्याच्या गळीत हंगामाची सुरवात मठाधिपती महंत रामगिरीजी महराज, देवगड संस्थानचे भास्करगिरी महाराज, प्रकाशनंदगिरी महाराज आदींसह मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी पंचगंगा साखर कारखान्यामुळे तालुक्यातील ऊस उत्पादकांसाठी हक्काचा कारखाना आहे. त्यातून तरुणांना रोजगार, इथेनॉलसह दहा उपपदार्थनिर्मितीमुळे इंधनाची गरज भागणार आहे. त्यामुळे हा कारखाना शेतकऱ्यांसाठी कामधेनू ठरणार असून वैजापूर, गंगापूर तालुक्यांचा विकास होऊन चांगले दिवस येतील, असे प्रतिपादन महंत रामगिरीजी महाराज यांनी केले.
कारखान्याचे चेअरमन प्रभाकर शिंदे, संचालक बाबासाहेब शिंदे व उत्तम शिंदे यांनी संत-महंतांचे पूजन केले. त्यानंतर खासदार संदीपान भुमरे, आमदार विठ्ठल लंघे, रमेश बोरनारे, माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर, अण्णासाहेब माने, बाजार समितीचे माजी सभापती संजय निकम, माजी नगराध्यक्ष साबेरखान, माजी सभापती बाबासाहेब जगताप, डॉ. राजीव डोंगरे, विजय पवार, रामहरी जाधव आदींचे स्वागत करण्यात आले. यावेळी आमदार रमेश बोरनारे यांनी संचालक प्रभाकर शिंदे यांच्या परिवारातील सर्व सदस्यांचे आभार मानले. डॉ. प्रकाश शेळके यांनी सूत्रसंचालन केले. सायली शिंदे यांनी आभार मानले. किसनराव गडाख, कुंडलिक राव माने, शिवाजी बनकर, लघाने हरिभाऊ, नारायण कवडे, भाऊसाहेब झिंझुर्डे, सचिन देसरडा, नितीन औताडे, बाबासाहेब जगताप व रंजित चव्हाण आदींसह शेतकरी उपस्थित होते.