पुणे : आगामी काळात सर्व निवडणुका लढावल्या जातील. पहिल्यांदा भवानीनगरचा छत्रपती सहकारी साखर कारखान्याची निवडणूक जिंकून कारखाना रुळावर आणायचा आहे, अशी घोषणा नवनिर्वाचित खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. इंदापुरातील शहा सांस्कृतिक भवनमध्ये गुरुवारी सुळे यांचा निवडणुकीतील विजयाबद्दल सत्कार करण्यात आला. त्यावेळी त्या बोलत होत्या. दुधाचा भाव वाढला पाहिजे. दूध आणि कांद्याला हमीभाव मिळवण्यासाठी पुढील आठ दिवसांत आंदोलन करायचे आहे.
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, लोकांनी जो विश्वास दिला आहे, त्यास पात्र ठरवून जास्त काम करायचे आहे. दहशतीला न घाबरता मतदारांनी उत्तर दिले आहे. या विजयाने जास्त हुरळून जाऊ नका. कुठलीही गोष्ट तुम्हाला कमी पडू देणार नाही. शरद पवार १२ जूनला इंदापूरच्या भागात दुष्काळी पाहणी दौरा करणार आहेत. दहा जूनला अहमदनगर येथे पक्षाचा पंचवीसावा वर्धापन दिन देखील साजरा केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी जिल्हा बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे, कर्मयोगी कारखान्याचे उपाध्यक्ष भरत शहा यांची भाषणे झाली. तालुका अध्यक्ष अॅड. तेजसिंह पाटील यांनी प्रास्ताविक केले. तालुका कार्याध्यक्ष महारुद्र पाटील, बहुजन मुक्ती पार्टीचे राष्ट्रीय सचिव अॅड. राहुल मखरे, अमोल भिसे, अशोक घोगरे, किसन जावळे, दत्तात्रय तोरसकर, सागर मिसाळ, प्रमोद राऊत, विजय शिंदे, कांतिलाल झगडे, अमोल भोईटे, निवास शेळके, अॅड. आशुतोष भोसले आदी उपस्थित होते.