छत्रपती साखर कारखाना यंदा अडचणीतून बाहेर निघेल : अध्यक्ष प्रशांत काटे

पुणे : श्री छत्रपती कारखान्याचा ६९ वा गाळप हंगाम शुभारंभ व बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ बुधवारी (दि. १३) पार पडला. यावर्षी उसाचे चांगले गाळप झाले तर श्री छत्रपती कारखाना आर्थिक अडचणीतून बाहेर पडण्यास मदत होणार आहे, असा विश्वास कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत काटे यांनी यावेळी व्यक्त केला. कारखान्याच्या कार्यक्षेत्रात ८६०३२ व इतर जास्त उतारा असणाऱ्या ऊस जातींची लागवड वाढण्यासाठी ४ वर्षांपासून प्रयत्न सुरू आहेत अशी माहितीही त्यांनी दिली.

कार्यकारी संचालक अशोक जाधव म्हणाले, गाळप हंगामासाठी कारखान्याकडून सर्व तयारी झाली आहे. या वर्षी कारखाना कार्यक्षेत्रात २१ हजार ४८१ एकर ऊस उपलब्ध असून यामधून ८ लाख टन ऊस गळीतास उपलब्ध होईल, असा अंदाज आहे. कार्यक्रमात बॉयलर अग्निप्रदिपन व्यवस्थापकीय अधिकारी विकास क्षीरसागर, त्यांच्या पत्नी पूनम क्षीरसागर आणि वित्तीय व्यवस्थापक हनुमंत करवर व त्यांच्या पत्नी स्वाती करवर यांच्या हस्ते करण्यात आले. वजनकाट्याचे पूजन शेतकी अधिकारी जालिंदर शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. तर कार्यकारी संचालक अशोक जाधव व सर्व अधिकारी, कर्मचारी यांच्या हस्ते मोळी टाकून गव्हाण पूजन करण्यात आले. उपाध्यक्ष अमोल पाटील, बाळासाहेब पाटील, दत्तात्रय सपकळ, राजेंद्र गावडे, संतोष ढवाण, सर्जेराव जामदार, नारायण कोळेकर, बाळासाहेब सपकळ, रसिक सरक, निवृत्ती सोनवणे, अमर कदम, खरेदी-विक्री संघाचे संचालक अमोल भोईटे, प्रशांत पवार आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here