रायपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी छत्तीसगडमध्ये ९,२४० कोटी रुपयांच्या ३३ रस्ते योजनांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. या प्रसंगी बोलताना त्यांनी राज्य सरकारने ऊस आणि धान्यापासून हरित इथेनॉलच्या उत्पादनावर लक्ष केंद्रीत करावे असे आवाहन केले. ते म्हणाले की, त्यातून पेट्रोलवरील अवलंबीत्व कमी होईल. त्यांनी भाताच्या तृणापासून (paddy straw) द्वितीय प्रतीचे इथेनॉल उत्पादन करण्यात यावे असा सल्लाही दिला. शेतकरी हे अन्नदाता आहेत. त्यांना ऊर्जादाता बनविण्याची गरज आहे, असे गडकरी म्हणाले.
मंत्री गडकरी म्हणाले की, छत्तीसगड भारताचा हिस्सा आहे आणि विकासाचे राजकीय पक्षांचे राजकारण वेगळी बाब आहे. २१ व्या शतकात राजकीय प्रगती आणि विकास हेच राजकारण आहे. गरीबी, भुक, बेरोजगारी दूर करणे हे आमचे सर्वांचे कर्तव्य आहे. आम्ही निवडणुकीच्या वेळी राजकारण करणे अपेक्षित आहे. मात्र, त्यानंतर देश, गाव, शेतकरी, गरीब यांच्या विकासाला प्राधान्य दिले पाहिजे. यावेळी मुख्यमंत्री भूपेश बघेल, लोक निर्माण विभाग मंत्री ताम्रध्वज साहू, माजी मुख्यमंत्री रमण सिंह, काही कॅबिनेट मंत्री, खासदार, आमदार उपस्थित होते.