मुख्यमंत्र्यांनी ऊस दर ४५० रुपये प्रती क्विंटल जाहीर करावा : व्ही. एम. सिंह

पिलीभीत : राष्ट्रीय किसान मजदूर संघटनेचे अध्यक्ष व्ही. एम. सिंह यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पत्र पाठवले आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा उल्लेख करत त्यांनी म्हटले आहे की, देशासाठी गेली ७५ वर्षे शेतकऱ्यांनी आपले बलिदान दिले आहे. आता सरकारने आपले आश्वासन पाळावे. उसाचा दर सरकारने ४५० रुपये प्रती क्विंटल करण्याची गरज आहे. तरच शेतकऱ्यांना दीडपट उत्पन्न मिळू शकते.

अमर उजालामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, युपीमध्ये ऊस शेतीशी संबंधीत जवळपास ३० जिल्ह्यांतील १०० हून अधिक तहसीलमधील शेतकऱ्यांनी व्ही. एम. सिंह यांच्या आवाहनानुसार १६ ऑगस्ट रोजी प्रती क्विंटल ४५० रुपये ऊस दर आणि ऊस बिलांची थकबाकी मिळण्यासाठी आवाज उठवला होता. मुख्यमंत्र्यांच्या नावे सर्व तहसील कार्यालयांमध्ये निवेदन देण्यात आले आहे. यामध्ये व्ही. एम. सिंह यांनी म्हटले आहे की, २०१८ मध्ये तत्कालीन ऊस मंत्र्यांनी विधानसभेत ऊसाचा उत्पादन खर्च २९४ रुपये असल्याचे मान्य केले होते. त्यानंतर उत्पादन खर्चात २० ते ३० टक्के वाढ झाली आहे. त्यामुळे ऊसाचा दर आता ४५० रुपये प्रती क्विंटल करण्याची गरज आहे. राज्य सरकारच्या नियमानुसार ऊस बिलांच्या थकबाकीवर १२ टक्के आणि केंद्र सरकारच्या नियमानुसार १५ टक्के व्याज मिळण्याची गरज आहे. मुख्यमंत्र्यांनी कारखान्यांकडून हे व्याज आणि थकबाकी वसूल करून शेतकऱ्यांना द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे. राज्यात ४७ लाख कुटूंबे आणि ३.७५ कोटी लोक ऊस शेतीशी निगडीत आहेत. त्यामुळे जर दरवाढ झाली तर राज्याचा जीडीपी वाढेल असे सिंह यांनी म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here