मुंबई, २९ :- भारतीय चित्रपट सृष्टीसाठी मोठे योगदान देणाऱ्या घराण्याचा वारसा असणारे, स्वतंत्र प्रतिभेचे, मनस्वी आणि निखळ अभिनेते ऋषी कपूर यांच्या जाण्याने कला क्षेत्राची हानी झाली आहे. ते चित्रपट सृष्टीतील दोन पिढ्यांच्या दरम्यान मार्गदर्शक दूवा होते, हा दूवा निखळला आहे, अशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अभिनेता ऋषी कपूर यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
शोकसंदेशात मुख्यमंत्री म्हणतात, अभिनयातील मानदंड पृथ्वीराज कपूर, द ग्रेट शो-मन राज कपूर यांच्या कुटुंबाने भारतीय चित्रपटसृष्टीसाठी दिलेले योगदान विसरता येण्यासारखे नाही. कुटुंबाचा हा वारसा ऋषी कपूर यांनी समर्थपणे पेलला. निखळ करमणूक आणि चित्रपट सृष्टीत आशयाच्या, तंत्रज्ञानाच्या अंगाने नवे प्रयोग करण्यात ते यशस्वी ठरले. चित्रपटसृष्टीचा कलात्मक अंगिकार ते ‘फिल्म इंडस्ट्री’ पर्यंतच्या प्रवासात ते सक्रिय राहीले. ते सहज सूंदर अभिनेता होते, तितकेच ते परखड आणि प्रांजळ व्यक्ति होते. रंगभूमी, लेखन, दिग्दर्शन आणि निर्मिती क्षेत्रातही त्यांनी आपल्या चिरतरुण व्यक्तिमत्वाप्रमाणे सर्जनशील ठसा उमटविला आहे. चित्रपट सृष्टीतील नव्या पिढीसाठी ते आश्वासक मार्गदर्शक होते. त्यांच्या निधनाने कलाकारांच्या दोन पिढ्यांना जोडणारा दुवा निखळला आहे. भारतीय कला क्षेत्राची हानी झाली आहे. ऋषी कपूर यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.