मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भाषणे समाज माध्यमातून पोहचली कोट्यवधींपर्यंत

मुंबई , दि. 24 :- महाराष्ट्रात कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी महाराष्ट्र शासन सर्वतोपरी आणि व्यापक असे प्रय़त्न करत आहे. यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुरवातीपासूनच राज्यातील जनतेला समाज माध्यमावरून थेट संबोधित करण्याचे पाऊल उचलले. कोरोनाच्या अनुषंगाने थेट संपर्क टाळून आणि सोशल डिस्टन्सिंग पाळून केलेला हा समाज माध्यमाचा वापर प्रभावी आणि उपयुक्त ठरला आहे. विशेषतः थेट प्रसारणानंतर टिक-टॉक या सोशल अॅपद्वारे मुख्यमंत्री ठाकरे यांची भाषणे एक कोटी ७७ लाख जणांनी पाहिली आहेत. मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांच्या अन्य भाषणांनाही सरासरी पन्नास लाखांहून अधिक जणांनी प्रतिसाद दिल्याची आकडेवारी आहे.

मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या अनुषंगाने #CMOmaharashtra या फेसबुक आणि @CMOMaharashtra या ट्विटर हँण्डलवरून अनेकदा थेट प्रक्षेपणाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला आहे. या भाषणाच्या चित्रफिती यु-टुयूबवरही आणि काही मुद्द्यांच्या अनुषंगाने फेसबुक संदेश म्हणूनही प्रसारीत करण्यात आल्या आहेत. यात टिक-टॉक या समाज माध्यमावरील चित्रफिती कोट्यवधींपर्यंत पोहचल्याचे दिसते. यातील भाषणांना एक कोटी ७७ लाख पासून ते ७८ लाख, ७७ लाख जणांनी प्रतिसाद दिला आहे. या भाषणांनी प्रतिसादाचा सरासरी पन्नास लाखांहून अधिकचा टप्पा गाठल्याचे आढळते.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ‘घरातच रहा’ हा आणि अत्यावश्यक म्हणून बाहेर पडल्यास ‘सोशल डिस्टन्सिंग’ चा नियम पाळणे अत्यंत महत्त्वाचे आहे. यातही मुख्यमंत्री म्हणून श्री. ठाकरे यांनी जनतेला आणि काही प्रसंगी विविध घटकांशी थेट संपर्क साधण्यासाठी समाज माध्यमांवर भर दिला आहे.

त्यादृष्टीने समाज माध्यमातील फेसबुक, ट्विटर आणि व्हिडीओ कान्फरन्सिंगचा प्रभावी वापर करणे सुरु केला आहे. फेसबुक लाईव्ह, ट्विटर वरील थेट प्रसारणामुळे कमीत कमी साधन सामुग्री आणि मनुष्यबळामुळे व्यापक स्तरावर संपर्क प्रस्थापित करणे शक्य होते. मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांच्या जनतेशी संवादाच्या लिंक या विविध वृत्त वाहिन्यांनीही थेट प्रक्षेपणात समाविष्ट केल्या. त्यामुळे मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांचा संदेश जनतेपर्यंत सहज आणि व्यापकरित्या शक्य झाले. त्यांच्या भाषणातील आश्वासक मुद्दे आणि संदेश नेमकेपणाने पोहचविता येत आहे. राज्याच्या मंत्रीमंडळातील अन्य मंत्रीही समाज माध्यमाच्या या खुबीचा प्रभावीपणे वापर करत आहेत. त्यामुळे कोरोनाच्या या आव्हानात्मक परिस्थितीत अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आता संयुक्तिक आणि सकारात्मक ठरू लागला आहे.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here