लखनौ : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्यात पाचट जाळल्याने वाढलेल्या प्रदूषणाबाबत चिंता व्यक्त करताना याच्या प्रतिकूल परिणामांबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करावी असे निर्देश अधिकाऱ्यांना दिले. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अधिकाऱ्यांना सांगितले की, या मुद्द्याची सोडवणूक करण्यासाठी त्यांनी शेतकऱ्यांमध्ये धोरणात्मक बाबीविषयी माहिती देत जागृती केली पाहिजे.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सांगितले की, संवेदनशील गावांमध्ये जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांना शिबिरे आयोजित करून पाचट जाळण्याच्या घटना रोखण्यासाठी उपाय योजना करण्यास सांगितले आहे. अतिरिक्त मुख्य सचिव (कृषी) देवेश चतुर्वेदी यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले की, प्रत्येक जिल्ह्यातील पाचट गोशाळेत नेले जात आहे. ते म्हणाले, पाचट द्या, खाद्य घ्या या कार्यक्रमाचाही सर्व जिल्ह्यांत व्यापक प्रचार सुरू आहे. यावेळी पाचट जाळण्याच्या घटनांमध्ये घट व्हावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत. उत्तर प्रदेशात १६ बायो ब्रिकेट आणि बायो कोल युनिट स्थापन केली गेली आहेत. तेथे पाचट पोहोचवले जात आहे, असे त्यांनी सांगितले.