नवी दिल्ली : चीनी मंडी
चीनने जानेवारी पूर्वी त्यांना लागणारा कच्च्या साखरेची ऑर्डर द्यावी, असे आवाहन भारताने चीनला केले आहे. अमेरिका आणि चीन यांच्यातील व्यापार युद्धामुळे चीनला यंदा भारतातून कच्ची साखर निर्यात करण्याच्या हालचाली सुरू आहेत. पण, जानेवारीनंतर भारतातील साखर कारखाने कच्च्या साखरेपासून शुद्ध प्रक्रियायुक्त साखर तयार करण्यास सुरुवात करतील, त्यानंतर चीनला कच्ची साखर निर्यात करणे अवघड होईल. त्यामुळे चीनने जानेवारीपूर्वीच त्यांचा कोटा जाहीर करावा, असे आवाहन भारताने केले आहे. सरकारमधील सूत्रांनी ही माहिती दिली.
भारतात साखर हंगाम गेल्या महिनाभरात सुरू झाला आहे. चीन सरकार त्यांना जानेवारी ते जून या काळात त्यांना लागणारा साखरेचा कोटा जानेवारीच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात जाहीर करते. पण, भारताला चीनला कच्ची साखर निर्यात करायची असेल, तर त्यासाठी डिसेंबरच्या सुरुवातीलाच चीनने साखरेची ऑर्डर देणे सोयीस्कर ठरणार आहे, असे भारतातील साखर निर्यातदारांचे म्हणणे आहे.
भारताकडून साखरेची आयात वाढवण्यासाठी चीने उपमंत्री हू वै यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने भारताच्या वाणिज्य आणि कृषी मंत्रालयातील अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. मुळात तांदळानंतर चीनने भारताकडून मोठ्या प्रमाणावर आयात करण्याची तयारी केलेले साखर हे दुसरे उत्पादन आहे. सुरुवातीच्या टप्प्यात इंडियन शुगर मिल्स असोसिएशन आणि चीनच्या सीओएफसीओ यांच्यात १५ हजार टन कच्च्या साखरेचा करार झाला आहे.
दरम्यान, चीनला २० लाख टन साखर निर्यात करता येईल, अशी भारतातील साखर उद्योगाला अपेक्षा आहे. पण, जर चीनने साखरेचा कोटा लवकर जाहीर केला, तर व्यापार अधिक सोपा होईल, असे सांगितले जात आहे.
या संदर्भात इस्माच्या एका बड्या अधिकाऱ्याने म्हटले आहे की, चीन केवळ कच्ची साखर आयात करतात, हा मुख्य मुद्दा आहे. एकदा भारतातील साखर कारखान्यांनी कच्ची साखर प्रक्रिया करून शुद्ध करण्यास सुरुवात केली, तर ते पुन्हा कच्ची साखर तयार करायला घेणार नाहीत. कारण त्यासाठी त्यांना त्यांच्या प्रक्रियेमध्ये खूप बदल करावे लागतात. एक दिवस काम थांबवावे लागते तसेच कच्च्या साखरेच्या पॅकिंगमध्येही बदल करून घ्यावे लागतात. एकदा लवकर ऑर्डर आली की, साखर कारखान्यांना शुद्ध साखरे ऐवजी कच्ची साखरच तयार करण्याची विनंती करता येऊ शकते. जर, जानेवारीमध्ये चीनने कोटा जारी केला, तर भारतीय साखर उद्योगाचा निम्मा हंगाम नुकसानीत जाऊ शकतो.